Solapur ZP
Solapur ZP Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आमदार संजय शिंदे अध्यक्ष असताना झेडपीत ‘रात्रीस खेळ चाले’

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय आणि विद्यमान सदस्यांची शेवटची सभा शुक्रवारी (ता. ११ मार्च) झाली. एकमेकांना काढलेले चिमटे आणि मारलेल्या कोपरखळ्यांनी आजची शेवटची सभा मात्र गोड झाली. मानाचे फेटे बांधून सदस्यांचा सत्कार करण्यात आला. मात्र त्यातील वेगवेगळे रंग आणि त्यामागील अर्थ ऐकल्यानंतर मात्र हस्याचे फवारे उडत होते. दरम्यान, संजय शिंदे (sanjay shinde) अध्यक्ष असताना झेडपीतील ‘रात्रीस खेळ चाले’ वरही भाष्य करण्यात आले. (The last meeting of Solapur Zilla Parishad members was sweet)

यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेकांनी पाच वर्षांतील अनुभव गोड अन्‌ तिखट शब्दांत मांडले. कळत-नकळत घडलेल्या घटनांमधून आजपर्यंत सदस्यांचा मनात काय दडले होते? याचा ठाव ठिकाणा अधिकारी अन्‌ पदाधिकाऱ्यांना झाला. झेडपी सदस्य अरुण तोडकर वगळता सर्वांच्या डोक्‍यावर फेटे होते. काहींच्या डोक्‍यावर हिरवा, पांढरा, भगवा तर काहींच्या डोक्‍यावर गुलाबी फेटा होता. अधिकाऱ्यांनी शांततेत काम केले म्हणून त्यांना पांढरा फेटा, पत्रकारांनी भडक बातम्या दिल्या म्हणून त्यांना भडक रंगाचा फेटा अन्‌ विरोधी पक्षनेते बळीराम साठे तावातावाने काम करतात; म्हणून त्यांना लाल फेटा बांधल्याचे गुपीत झेडपी सदस्य मल्लिकार्जून पाटील यांनी सांगितले. आम्ही घातलेले फेटे मानाचे आहेत, टोप्या नाहीत असे सांगून सीईओ दिलीप स्वामी यांनी हास्याचा षटकार ठोकला. मल्लिकार्जून पाटील हे माझे गुरू असल्याचे सदस्य ॲड. सचिन देशमुख यांनी सांगितले. तुम्हीही गुरु झाला असता असे सांगून पाटील यांनी परतफेड केली.

तावातावाने बोलणारे दुसऱ्या सभेला शांत बसायचे!

झेडपीचे अध्यक्ष असताना संजय शिंदे यांनी आमदारकी डोळ्यासमोर ठेवून करमाळ्याला निधी नेला. आम्ही नवीन होतो. अनेक सदस्य सभेत तावातावाने बोलायचे आणि दुसऱ्या सभेला शांत बसायचे. ‘झेडपी’तील ‘रात्रीस खेळ चाले’ हे प्रकरण समजल्यानंतर हा विषय लक्षात आल्याचे सदस्या ज्योती पाटील यांनी सांगितले.

संजय शिंदेंना चार कामे सांगितली तर दोन नक्की व्हायची

तत्कालिन अध्यक्ष संजय शिंदे यांना चार कामे सांगितली तर त्यातील दोन कामे नक्की व्हायची. त्यांचा जिल्हा परिषदेत दबदबा होता, सर्वसाधारण सभाही व्यवस्थित व्हायची. मदन दराडे आणि माझ्यामध्ये सभेत वाद व्हायचे, परंतु सभागृहाच्या बाहेर आमचे वाद कधीही गेले नसल्याचे सदस्या रेखा राऊत यांनी नमूद केले.

डोंगरेंना अक्कलकोट, दक्षिणची ताकद दाखवण्याचा इशारा

माजी सभापती शिला शिवशरण म्हणाल्या, सभापती डोंगरे यांनी तीन वर्षे चांगले सहकार्य केले. त्यानंतरच्या दोन वर्षात मात्र दुर्लक्ष व नुसतेच गोड गोड बोलले. सभापती डोंगरे यांनी त्यांचे नाव गोडबोले ठेवावे असा चिमटा माजी सभापती शिवशरण यांनी काढला. दादा आम्हाला डच्चू देऊ नका; म्हणत आण्णाराव बाराचारे यांनी सभापती डोंगरे यांना अक्कलकोट व दक्षिणची ताकद दाखविण्याचा इशारा दिला. सभापती डोंगरे यांनी मला जावायाप्रमाणे निधी दिल्याचे सदस्य नितीन नकाते यांनी सांगितले.

मी पुन्हा झेडपीत दिसणार नाही : तोडकर

माझे नाव घेतले की लोक हसतात ही माझी कमाई असल्याचे सांगून सदस्य अरुण तोडकर म्हणाले, आमची अडीच वर्षे विरोधात, दोन वर्षे कोरोनात अन्‌ एक वर्षे कोर्टकचेरीत गेले. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यामुळे माझ्यासारखा सामान्य कुटुंबातील माणूस झेडपीचा सदस्य झाला. माझे गाव नगरपंचायत झाल्याने मी काय आता झेडपीत येत नाही असे सांगून आजपर्यंत सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल तोडकर यांनी आभार मानले, त्यांचे वाक्‍य पूर्ण होण्यापूर्वीच तुम्हाला बळीराम साठेंचेही सहकार्य मिळाल्याची आठवण सदस्य सुभाष माने यांनी करुन दिली.

डोंगरेंसाठी हात कसा वर केला हे मलाच समजले नाही

जिल्ह्याचे राजकारण पूर्वी एका विचाराने चालायचे, तेव्हा फारशी अडचण नव्हती. आता जिल्ह्याच्या राजकारणात महाभारत सुरू झाल्याने आमच्यासारखे तरुण कार्यकर्ते भरडले जात असल्याचे मल्लिकार्जून पाटील यांनी सांगितले. सभापती निवडीत डोंगरे यांना मतदानासाठी मी कसा हात वर केलो, हे माझे मलाच समजले नसल्याचे पाटील यांनी सांगितले.

हसापुरेंना पाडल्यामुळे बाराचारेंना अधिकाऱ्यांची मदत

मी जिल्हा परिषदेचा सदस्य झाल्यापासून आतापर्यंत मला अधिकाऱ्यांनी खूप उचलून धरले. मी कोणाला पाडले म्हणून मला अधिकाऱ्यांनी मदत केल्याचे माहिती नाही; परंतु मला अधिकाऱ्यांची मोठी मदत झाल्याचे बाराचारे यांना सांगितले. तुम्ही सुरेश हसापुरेंना पाडलात म्हणून तुम्हाला अधिकाऱ्यांनी मदत केल्याचा शेरा शेजारील सदस्यांनी मारताच ते मला माहिती नसल्याचे बाराचारे यांनी सभागृहात सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT