Laxman Dhoble-Abhijeet Dhoble-Sharad Pawar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Abhijeet Dhoble : वडिलांना मानाचे पान देणाऱ्या पवारांच्या राष्ट्रवादीविरोधात अभिजीत ढोबळे बंड करणार?

Assembly Election 2024 : माझ्यासह ज्यांनी उमेदवारी मागितली, ते पक्षामध्ये अधिकृत सदस्य होते. मात्र जे पक्षात नाहीत, त्यांना पक्षाकडून उमेदवारी मिळते. तसेच, राजू खरे यांच्या शेजारील माणसे ही एकनाथ शिंदे यांची आहेत, असा आरोप अभिजीत ढोबळे यांनी केला आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur, 07 November : एकीकडे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंना पक्षात प्रवेश केल्यानंतर काही दिवसांतच प्रदेश उपाध्यक्षपदावर काम करण्याची संधी देण्यात आली असतानाच त्यांचे चिरंजीव अभिजीत ढोबळे यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघात दिलेला उमेदवार मान्य नसल्याचे सांगत राजू खरे यांना पाठिंबा द्यायचा की नाही, याबाबतचा निर्णय येत्या 14 तारखेला घेणार असल्याचे अभिजीत ढोबळे यांनी सांगितले.

अभिजीत ढोबळे (Abhijeet Dhoble) यांनी पुढील दिशा ठरविण्यासाठी कार्यकर्त्यांची सहविचार सभा बोलावली होती. त्या सभेत बोलताना ढोबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP SP) उमेदवार राजू खरे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली. खरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांच्यासोबतची लोकही शिंदे यांचे कार्यकर्ते आहेत, असा आरोप अभिजीत ढोबळे यांनी केली.

मोहोळ मतदारसंघात (Mohol Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराच्या नेतृत्वाखाली काम करणे, पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्याला मान्य नाही. त्यामुळे, पक्षाचे अधिकृत उमेदवार राजू खरे यांना पाठिंबा द्यायचा की नाही याबाबत 14 तारखेला अंतिम निर्णय घेणार आहे. माझ्यासह ज्यांनी उमेदवारी मागितली, ते पक्षामध्ये अधिकृत सदस्य होते. मात्र जे पक्षात नाहीत, त्यांना पक्षाकडून उमेदवारी मिळते. तसेच, राजू खरे यांच्या शेजारील माणसे ही एकनाथ शिंदे यांची आहेत, असा आरोप अभिजीत ढोबळे यांनी केला आहे.

मोहोळ मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराच्या नेतृत्वाखाली काम करणे, हे आमच्या पक्षाच्या कोणत्याही नेत्याला मान्य होत नाही. मात्र आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेदवाराकडे जातात आणि त्यांच्या घरातून प्रचाराचे नियोजन करतात, त्यामुळे पक्षात नेमकं काय चाललंय, हे आम्हालाही कळत नाही, असा टोलाही त्यांनी नाव न घेता जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांना लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष म्हणून आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मदत करायची की एकनाथ शिंदे यांच्या माणसाला मदत करायची, याबाबत नेमकं काय करायचं हे मला कार्यकर्त्यांना विचारावे लागेल. त्यामुळे मी पक्षनेतृत्वाकडे 14 तारखेपर्यंत वेळ मागितली आहे. येत्या 14 तारखेला माझी भूमिका मी जाहीर करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मोहोळ विधानसभा मतदारसंघात दिलेले उमेदवार राजू खरे यांच्याबाबत अभिजीत ढोबळे नाराज आहेत, त्यातूनच ढोबळे यांनी बंडाची भाषा सुरू केली आहे. विशेष म्हणजे एकीकडे अभिजीत यांचे वडील लक्ष्मण ढोबळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे, तर दुसरीकडे मुलांनेच पक्षाच्या विरोधात बंडाची भाषा सुरू केली आहे.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT