Solapur Political News : पुण्यात असलेल्या बागेश्वर बाबांच्या दरबारात राज्यभरातील राजकारण्यांनी रांग लावली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आशीर्वाद घेण्यासाठी ही मंडळी या दरबारात हजेरी लावत असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणूक जाहीर होण्यास काही महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. भाजपकडून सोलापूर लोकसभा निवडणुकीचे संभाव्य दावेदार मानले जाणारे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनीही बागेश्वर बाबांचे दर्शन घेतले. ढोबळेंच्या या हजेरीनंतर सोलापूरमध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.
दुष्काळी निकषात डावलल्याने सोलापूर लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार नाही. या मतदारसंघात विद्यमान उमेदवारावर शेतकरी वर्गातून मोठी नाराजी आहे. त्याचबरोबर सोलापूर शहरातील पिण्याचे पाणी, पंढरपूर-विजयपूर रेल्वे, मतदारसंघातील अन्य तालुक्यातील शेतीचे पाणी, पीक विमा हे प्रश्न प्रलंबित आहेत. या स्थितीत सोलापूरचे खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्याबाबत नाराजी निर्माण झाली आहे. परिणामी भाजप या जागेसाठी नव्या चेहरा शोधण्याच्या दृष्टीने चाचपणी करत आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सध्या या जागेसाठी जवळपास डझनवर नावे यासाठी चर्चेत येत आहेत. त्यामध्ये कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता जिल्ह्यात आहे. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी यापूर्वी या मतदारसंघात पालकमंत्री म्हणून काम केले आहे. प्रत्येक तालुक्यात त्यांचा संपर्क आहे. पाणीपुरवठा मंत्री म्हणून काम करताना या मतदारसंघात अनेक योजनेला निधी उपलब्ध केला. त्यामुळे ते देखील या उमेदवारीच्या स्पर्धेत येत आहेत.
सध्या ते पक्षाचे प्रवक्ते म्हणून काम करीत असून सोलापूर लोकसभेच्या उमेदवारीबाबत एकएक पाऊल टाकत आहेत. तसेच पक्षाने नवीन तरुण चेहरा द्यायचा निर्णय घेतला तर त्यांची कन्या अॅड. कोमल ढोबळे यांचेही नाव पुढे येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणूक जाहीर होण्यास अजून अवधी आहे. मात्र याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री ढोबळेंनी पुणे येथे गुरुवारी बागेश्वर बाबांचे आशीर्वाद घेतले आहेत. हा आशीर्वाद नेमका कोणत्या कारणासाठी घेतला, याची उत्सुकता मतदारसंघात लागली आहे.
शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराचा वारसा घेऊन अंधश्रद्धा, रूढी परंपरेवर जोरदार प्रहार केलेल्या ढोबळेंनी बागेश्वर बाबांच्या दरबारात हजेरी लावल्याने चर्चांना उधाण आले आहे. मात्र बागेश्वर बाबांचे आशीर्वाद घेऊन ढोबळे आता नेमका कोणता डाव साधतात, याकडे सोलापूरचे लक्ष लागले आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.