Ajit Pawar News  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

गायरान अतिक्रमणाबाबत अजितदादा विधानसभेत लक्षवेधी मांडणार

Satara News : दलीत महासंघाच्या शिष्टमंडळाला अजितदादांचे आश्वासन

सरकारनामा ब्यूरो

कऱ्हाड : गायरान आणि सरकारी जमिनीवरील अतिक्रमणाबाबतच्या प्रश्नाबाबत विधानसभेत लक्षवेधी मांडणार असल्याचे आश्वासन विधानसभेतील विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी दलीत महासंघाच्या शिष्टमंडळाला दिले आहे.

गायरान आणि सरकारी जमिनीवरील निवासी अतिक्रमणे हटवण्यात यावी, या उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे भूमिहीन, शेतमजूर, अनुसूचित जाती -जमाती व भटके विमुक्त यांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे त्यांच्या घरांना संरक्षण देण्यात यावे, अशी विनंती दलीत महासंघाच्या शिष्टमंडळाने आज अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे केली.

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात याबाबत लक्षवेधी मांडू, असे आश्वासन अजित पवार यांनी यावेळी दिले. अजित पवार हे आज सांगली (sangli) दौर्‍यावर जात असताना कऱ्हाड (जि.सातारा) येथे काहीकाळ थांबले होते. आमदार बाळासाहेब पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.मच्छिंद्र सकटे, कार्याध्यक्ष प्रकाश वायदंडे, जिल्हाध्यक्ष रमेश सातपुते, बहुजन समता पार्टीचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ दाभाडे, जयवंत सकटे, शंकर तुपे, सुहास पिसाळ, तानाजी वायदंडे, सुधिर साठे, संजय मदने, विनोद अवघडे, दिनकर पिसाळ आदींनी पवारांची भेट घेऊन गायरान जमिनीच्या प्रश्नाबाबत चर्चा केली.

यावेळी अजित पवार यांनी तातडीने राज्याचे महसूल व वनविभाचे सचिव डॉ.नितीन करीर यांच्याकडून मोबाईलवरुन या विषयाची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी संबंधित शिष्टमंडळाला राज्य सरकार उच्च न्यायालयाच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करण्याच्या तयारीत असले तरी देखील विरोधी पक्षनेता म्हणून विधानसभेत मी स्वत: आणि विधानपरिषदेत विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) हे लक्षवेधी मांडतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT