Solapur, 22 November : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आमदार अन् माजी आमदारांचे कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत. कार्यकर्ता मैदानात असला तरी या निकालात नेत्याची प्रतिष्ठा दडली आहे. आमदार राजेंद्र राऊत, आमदार सचिन कल्याणशेट्टी हे बिनविरोध संचालक झाले. त्यांचे कार्यकर्ते अनुक्रमे महादेव कांबळे अन् राजेंद्र बंदिछोडे हे राखीव मतदारसंघातून लढत असल्याने या दोघांच्या निकालावर आमदार राऊत व कल्याणशेट्टी यांची प्रतिष्ठा अवलंबून आहे.
भाजपच्या विरोधात खासदार धैर्यशील मोहिते-पाटील आणि माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनेलच्या माध्यमातून ९ उमेदवार मैदानात उतरविले आहेत. या पॅनेलच्या विजयाच्या स्ट्राईक रेटवर मोहिते-पाटलांची प्रतिष्ठा अवलंबून आहे.
माळशिरस सोसायटी मतदारसंघातून अर्जूनसिंह मोहिते-पाटील, शहाजीराव देशमुख आणि ज्ञानराज पाटील यांच्यात लढत होत आहे. शहाजीराव देशमुख हे भाजपच्या पॅनेलमधील उमेदवार असल्याने येथील निकाल पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार राम सातपुते यांच्यासाठी महत्वाचा असणार आहे. आमदार उत्तम जानकर यांनी या निवडणुकीत ज्ञानराज पाटील यांनी उतरवून माळशिरसच्या सहकारातील आपले अस्तित्व कायम ठेवले आहे.
आमदार राऊत यांचे समर्थक असलेले महादेव कांबळे हे अनुसुचित जाती/जमाती मतदारसंघातून लढत आहेत. त्यांच्या विरोधात मंगळवेढ्यातील मोहिते-पाटील समर्थक दत्तात्रय खडतरे आहेत. या मतदारसंघाच्या निकालावर आमदार राऊत आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांची प्रतिष्ठा अवलंबून असणार आहे.
विमुक्त जाती/भटक्या जमाती मतदारसंघातून अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे कार्यकर्ते राजेंद्र बंदिछोडे व सांगोल्याचे माजी आमदार (स्व.) गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांच्यात लढत होत आहे. या मतदारसंघाच्या निकालाचा थेट परिणाम सांगोला विधानसभा मतदारसंघावर होणार आहे.
पणन व प्रक्रिया मतदारसंघातून रणजित शिंदे विरुद्ध मोहिते-पाटील समर्थक संग्रामसिंह जहागिरदार यांच्यात लढत होत आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील लक्षवेधी लढत म्हणूनही याकडे पाहिले जात आहे. माजी आमदार दीपक साळुंखे यांचे पुत्र सुर्यादित्य साळुंखे विरुध्द माढ्यातील शिवाजी पाटील यांच्यात दुग्ध संस्था मतदारसंघात लढत होत आहे. माढा, पंढरपूरमधील दुग्ध संस्था काय करणार? यावर या मतदारसंघाचा निकाल अवलंबून दिसतो.
लक्षवेधी लढत
नागरी बँका व पतसंस्था मतदारसंघातून आमदार सुभाष देशमुख यांचे पुत्र मनीष देशमुख विरुध्द शिवसेनेचे नगरसेवक अमोल शिंदे अशी लढाई होत आहे. शिंदे व देशमुख या दोघांसाठीही बँक नवीनच आहे. बँकेच्या माजी संचालकांना कोण जवळचे व सुरक्षित वाटतात, देशमुख की शिंदे? यावर या मतदारसंघाचा निकाल अवलंबून आहे. जिल्ह्याच्या राजकारणात स्थिरावण्यासाठी मनीष देशमुख यांच्यासाठी हा निकाल ‘टर्निंग पॉईंट’ ठरण्याची शक्यता आहे.
एकमेकांना मदतीची गरज
पणन मतदारसंघात आमदार कल्याणशेट्टी यांच्याकडे सर्वाधिक मतदार आहेत. रणजित शिंदे यांना विजयी होण्यासाठी आमदार कल्याणशेट्टी यांच्या मतांची गरज आहे. दुग्ध मतदारसंघात सर्वाधिक संस्था पंढरपूर व माढ्याकडे आहेत. त्यामुळे सूर्यादित्य साळुंखे यांना विजयी होण्यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक व रणजित शिंदे यांची मदत लागणार आहे. या निवडणुकीत परिचारक यांचे समर्थक असलेले दिलीप घाडगे यांच्या पत्नी अर्चना घाडगे यांना महिला मतदारसंघातून भाजपने उमेदवारी दिली आहे. बँकेच्या निवडणुकीत आपली माणसं विजयी करण्यासाठी सर्वांनाच एकमेकांची गरज पडणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.