

Mangalvedha, 22 November : पंढरपूर नगरपालिकेच्या कारभारात माजी आमदार प्रशांत परिचारक समर्थक आणि विरोधी तीर्थक्षेत्र विकास आघाडीत वारंवार खटके उडत आहेत. मात्र, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मंगळवेढ्यातील तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगरसेवकांनी माजी आमदार परिचारक यांचा सत्कार करून त्यांना अध्यक्षपदासाठी शुभेच्छा दिल्या. पण परिचारकांनी अध्यक्षपदाचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर होणार असल्याचे सांगून अधिक बोलणे टाळले.
जिल्हा बॅंकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर माजी आमदार प्रशांत परिचारक हे प्रथमच मंगळवेढ्यात आले होते. त्यानिमित्ताने समविचारी आघाडी आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नेत्यांनी माजी आमदार परिचारक यांचा सत्कार केला. त्या वेळी शाब्दीक फटकेबाजीने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
या वेळी दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील, संचालक औदुंबर वाडेकर, राजेंद्र पाटील, अशोक माळी, रमेश जोशी, तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक अरुण किल्लेदार, सोमनाथ माळी, शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रतीक किल्लेदार, गणेश धोत्रे, तेजस सूर्यवंशी, आय्याज शेख, रमीझराजा मुल्ला, नरेंद्र मर्दा आदी उपस्थित होते.
परिचारक यांच्या आगमनावेळी फटाक्याची आतीषबाजी करण्यात आली. नगरसेवक सोमनाथ माळी यांनी फटाक्याची माळ लावल्याने त्यांच्याकडे पाहत तुम्ही भिजवून जरी लावली तरी त्या फटाक्यांचा आवाज मोठाच निघतो, असे परिचारक यांनी म्हणताच सगळे हास्यकल्लोळात बुडाले. त्यानंतर सत्काराप्रसंगी घालण्यात आलेल्या हाराच्या ओझ्याबाबत बोलताना ‘किती पण ओझ्याचा हार असुद्या चालतोय, आपणाला’ असे सांगून आतापर्यंत शहरातील अडचणींचे आणि अवघड प्रश्न आपण सोडवले आहेत, अशी मिश्किल टोलेबाजीही परिचारक यांनी केली.
या वेळी रमेश जोशी यांनी प्रशांत परिचारक यांना जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदासाठी शुभेच्छा दिल्या, त्यावर प्रशांत परिचारक यांनी हा निर्णय आताच होणार नाही. याबाबतचा निर्णय वरिष्ठ घेतील, असे सांगितले. त्यावर उपस्थितांनी ‘आमच्या भावना वरिष्ठांपर्यंत तरी पोहोचल्या पाहिजेत,’ अशी भूमिका मांडली.
मंगळवेढ्यातील भाजपविरोधी नगरसेवकांना परिचारकांच्या माध्यमातून सरकार जवळ जाऊन त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याचा विशेषतः शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करण्याचा एक पर्याय उपलब्ध झाला आहे. मात्र 2029 साठी नवीन पर्याय असू शकतो का, याचीही या निमित्ताने चर्चा सुरू झाली. कारण, तीर्थक्षेत्र आघाडीचे नगरसेवक हे शिवसेना नेते भगीरथ भालके यांना मानणारे आहेत, त्यामुळे भविष्यातील त्यांच्या राजकीय हालचाली या निमित्ताने निर्णायक ठरणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.