Sangli -Miraj News : आगामी स्थानिकच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सांगली जिल्ह्याची दारं उघडताना दिसत आहे. नुकताच निशिकांत पाटील यांच्या मदतीने चार माजी आमदार आणि इतर नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यामुळे कार्यकर्त्यांसह नेत्यांची वाणवा असणाऱ्या राष्ट्रवादीला आता चांगलेच दिवस येताना दिसत आहेत. मात्र याचा फटका आता महायुतीतील मित्र पक्ष असणाऱ्या भाजपलाच बसताना दिसत आहे. मिरजमध्ये सध्या भाजपला गळती लावण्याचे काम राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडीच करताना दिसत आहेत.
विधानसभेच्या तोंडावर महायुतीतील मित्र पक्ष असणाऱ्या भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसने ग्रामीणचा जिल्हाध्यक्षच फोडला होता. निशिकांत पाटील यांचा प्रवेश घडवून आणत एका दगडात दोन पक्षांची शिकार करण्याचा राजकीय डाव अजित पवार यांनी टाकला होता. त्यात ते यशस्वी झाले होते. निशिकांत पाटील यांनी घड्याळ हाती घेत पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतली आणि एक एक पक्षप्रवेश घडवून आणला आहे. काहीच दिवसांपूर्वी चार माजी आमदारांना पक्षात घेत पक्षाची ताकद वाढवली असतानाच आता टाकळीत विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी भाजपला धक्का दिला आहे.
नायकवडी यांनी टाकळीच्या सरपंच हीना नदाफ यांना राष्ट्रवादीत घेतलं आहे. त्यांचा पक्ष प्रवेश झाला असून त्यांच्याबरोबर यावेळी सदस्य विमल वाघमारे, पूजा भोसले, रीधा मुजावर यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यामुळे टाकळीत भाजपला गळती लागल्याचे आता बोललं जात असून मित्र पक्षाच्या आमदारानंच येथे भगदाड पाडल्याची चर्चा सुरू झाली आहे.
टाकळीच्या सरपंच हीना नदाफ यांनी तिसऱ्यांदा अवघ्या दहा महिन्यांतच भाजपला रामराम ठोकला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून आमदार नायकवडी यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले. यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला मिरज तालुक्यात आणखी बळ मिळाले आहे. मात्र तीन वर्षांत तीनदा पक्ष टाकळीच्या सरपंचांनी बदलल्यामुळे परिसरात राजकीय चर्चा रंगली आहे.
हीना नदाफ काँग्रेसकडून निवडून आल्या होत्या. पण त्यानंतर त्यांनी पंचायत समितीच्या एका माजी सदस्याच्या उपस्थितीत माजी मंत्री सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण आता आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादा गटाचे मिरज विधानसभा क्षेत्राध्यक्ष महादेव दबडे यांच्या साथीने त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
दरम्यान विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला देखील मोठा धक्का दिला. त्यांनी शीतल सोनवणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत घेत आपलं पारडं जड करण्याचा प्रयत्न केला आहे. तर नव्याने पक्षात आलेल्या शीतल सोनवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिरज शहर महिला अध्यक्षपदी निवड केली आहे. यामुळे पक्ष वाढीला मदत मिळणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.