
Mumbai News : महायुतीमध्ये राज्य पातळीवर असलेला वाद आता गाव पातळीवर देखील पोहचला आहे. राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून तीन पक्षात एकमेकावर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली जात नसल्याने वाद चव्हाट्यावर आला आहे. एकीकडे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडताच निधी वाटपावरून मंत्री व आमदार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतानाच आता बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे राष्ट्रवादी कॉँग्रेस अजित पवार गटाकडून भाजपच्या आमदाराला घेराव घालण्यात आला. यामुळे महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
मलकापूर शहरातील प्रश्न सोडविण्याकडे भाजप (BJp) आमदाराचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून नालेसफाई न झाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले होते. या मोर्चादरम्यान भाजपचे आमदार चैनसुख संचेती घटनास्थळी दाखल झाले असता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घालून तीव्र शब्दांत त्यांना जाब विचारला.
मलकापूर शहरात गेल्या काही दिवसापासून नालेसफाई झाली नाही, त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यासोबतच घनकचरा व्यवस्थापन आणि पाणीपुरवठ्यासारख्या मूलभूत सुविधांवरील दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून मलकापूर नगर परिषदेवर घागर मोर्चा काढण्यात आला होता.
यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून भाजप आमदार चैनसुख संचेती यांना घेराव घालण्यात आला. यावेळी आमदार संचेती त्या ठिकाणी आल्याने अजित पवार गटाच्या नेत्यांनी त्यांना धारेवर धरले. यामुळे मलकापूरमध्ये महायुतीमध्येच मतभेद असल्याचे पाहायला मिळाले.
स्थानिक राजकारणात महायुतीमध्ये संघर्ष
मलकापूर नगर परिषदेला पूर्णवेळ मुख्याधिकारी नाही. त्यामुळे प्रशासनात संभ्रम निर्माण झाला आहे, ज्याचा परिणाम शहरातील समस्यांवर होतो आहे. या सगळ्या घडामोडींमुळे मलकापूरमध्ये महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील वाद चव्हाट्यावर आला असून, स्थानिक राजकारणात हा संघर्ष चर्चेचा विषय ठरत आहे.
आंदोलनाचा इशारा
मोर्चानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मलकापूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. गेल्या 15 दिवसापासून होणाऱ्या दुषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. त्यामुळे डायरीया, मलेरीया सारख्या संसर्गजन्य आजारांना सामोरे जावे लागत आहे. जनतेच्या मुलभुत हक्काच्या सुविधांकडे दुर्लक्ष होत असून मुलभूत गरजांची त्वरित दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.