Wai Harihareshwar Bank sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Wai News : हरिहरेश्‍वर सहकारी बँकेचा परवाना रद्द; रिझर्व्ह बँकेची कारवाई

Umesh Bambare-Patil

-भद्रेश भाटे

RBI News : रिझर्व्ह बँकने मंगळवारी (ता. ११) वाई येथील हरिहरेश्‍वर सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. बँकेकडे व्यवहारासाठी पुरेसे भांडवल आणि उत्पन्नाचे साधन नसल्याने बँकेचा व्यवसाय परवाना रद्द केला असल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाप्रबंधक योगेश दयाळ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

जिल्हा विशेष लेखा परीक्षक (सहकारी संस्था-सातारा) विजय सावंत यांनी हरिहरेश्‍वर सहकारी बँकेचे Harihareshwar Bank संस्थापक संचालक नंदकुमार ज्ञानेश्‍वर खामकर व संचालक वजीर कासमभाई शेख आणि बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, व्यवस्थापक, रोखपाल आणि तीन सनदी लेखापाल यांच्यासह २९ जणांवर वाई पोलिस Wai ठाण्यात २६ ऑगस्ट २०२१ गुन्हा दाखल केला होता.

या सर्वांनी संगनमताने ११२ कर्जदारांच्या नावे बनावट कागदपत्रे व दस्तऐवज तयार करून गहाणखत व कर्जप्रकरणे दाखवून, तसेच बांधकाम केलेल्या सदनिका कर्जदारांना दिल्याचे दर्शवून संबंधितांच्या नावे कर्ज घेऊन बँकेच्या आर्थिक निधीचा गैरविनियोग व अपहार करून बँकेच्या सभासदांची व ठेवीदारांची एकूण ४२ कोटी ४६ लाख ८९ हजार ३४४ रुपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार त्यांनी पोलिसांत दाखल केली.

याप्रकरणी सातारा आर्थिक गुन्हे शाखेने नंदकुमार खामकर यांच्यासह सहा जणांना अटक केली होती. त्यापैकी पाच जणांची जामिनावर मुक्तता झाली आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर बँकेवर प्रशासक नेमण्यात आला असून, कर्ज वसुलीचे काम सुरू आहे. दरम्यान, ठेवीदारांच्या पाच लाखांपर्यंत सुमारे ९९.९६ टक्के ठेवींची रक्कम डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन कडून ८ मार्च २०२३ पर्यंत बँकेच्या एकूण विमा उतरवलेल्या ठेवींपैकी ५७.२४ कोटी रुपये ठेवीदारांना दिले आहेत.

रिझर्व्ह बँकेने या बँकेचा परवाना रद्द करताना त्यांना ‘बँकिंग व्यवसाय’ करण्यास मनाई केली असून, ठेवी स्वीकारणे आणि ठेवी परत करण्यास बंदी घातली आहे. सहकार विभागानेही रिझर्व्ह बँकेला या बँकेच्या अनियमिततेबाबत व बँकेवर अवसायक नेमण्यात आल्याचे कळविले होते, त्याप्रमाणे रिझर्व्ह बँकेने सदर कारवाई केली आहे. या बँकेबरोबरच श्री. शारदा महिला सहकारी बँक, तुमकूर, कर्नाटक या बँकेचाही परवाना रिझर्व्ह बँकेने रद्द केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT