Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

‘अरुणाचलप्रमाणेच महाराष्ट्रातही उद्धव ठाकरेच पुन्हा मुख्यमंत्री होतील!’

प्रमोद बोडके

सोलापूर : अरुणाचल प्रदेशमध्ये (Arunachal Pradesh) राज्यपाल (Governor) राज्य सरकारसोबत ज्या पद्धतीने वागले होते, त्याच पद्धतीने महाराष्ट्राचे (Maharashtra) राज्यपालही येथील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारसोबत वागले आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये न्यायालयाने पुन्हा जुन्या मुख्यमंत्र्यांना संधी दिली, तसेच महाराष्ट्रातही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पुन्हा मुख्यमंत्री (Chief Minister) होतील, असा विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केला. (Like Arunachal, Uddhav Thackeray will be Chief Minister again in Maharashtra)

एमआयएमचे माजी नगरसेवक तौफिक शेख यांच्यासह पक्षाच्या सहा माजी नगरसेवकांनी शुक्रवारी (ता. १२ ऑगस्ट) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्या प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी जयंत पाटील हे सोलापुरात आले होते. त्यावेळी न्यायालयावर आमचा विश्वास असून अरुणचल प्रदेशमध्ये ज्या प्रमाणे घडले, त्याच पद्धतीने महाराष्ट्रात पुन्हा जुन्या मुख्यमंत्र्यांना न्यायालय संधी देईल, असा आशावाद व्यक्त केला.

जयंत पाटील म्हणाले की, न्यायालयावर आमचा पूर्ण विश्‍वास आहे. पुढील एक ते दोन महिन्यांमध्ये महाराष्ट्रात अरुणाचल प्रदेश प्रमाणे निर्णय झालेला दिसेल. तसेच, मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणे सोपे आहे. मात्र, मंत्री म्हणून आमदारांची निवड करणे कठीण आहे. शपथ दिलेल्या मंत्र्यांना खातेवाटप करणे तर त्याहून अधिक अवघड असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आता समजले असेल. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये असलेले नगरविकास खातेच आताच्या मुख्यमंत्रिपदापेक्षा बरे होते. आपण इथे येऊन कुठे अडकलोय, असेच मुख्यमंत्री शिंदे यांना वाटत असेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांची सध्या होत असलेल्या कसरतीवर जयंत पाटलांनी भाष्य केले.

महाविकास आघाडी म्हणून तिघेही एकत्र राहणार

राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेस आम्ही तिघे महाविकास आघाडी म्हणून एकत्रितच आहोत. विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीला, शिवसेनेला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद मिळाले आहे. कॉंग्रेसलाही सन्मानाचे पद दिले जाईल, असेही जयंत पाटील यांनी या वेळी स्पष्ट केले.

राजन पाटील-बबनदादा राष्ट्रवादीतच राहतील

मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी सोलापूरच्या विमानतळावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भेट घेतली. सिद्धेश्‍वरांच्या मंदिरात जाऊन माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी प्रदेशाध्यक्ष पाटील यांची भेट घेतली. आमदार शिंदे आणि माजी आमदार पाटील हे दोघेही राष्ट्रवादी सोडणार नाहीत. ते आमच्यासोबतच राहतील असा विश्‍वासही प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी व्यक्त केला. तसेच, माजी आमदार राजन पाटील यांच्यावर उमेश पाटील यांच्याकडून होणारी टीकाही यापुढे होणार नाही, ती थांबलेली असेल, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT