Sangli News : लोकसभेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर विकासकामांचा धडाका सुरू आहे. जिल्ह्यात पालकमंत्री, खासदार, आमदारांकडून आपापल्या मतदारसंघात विकासकामांचे श्रेय अन्य कुणाला जाऊ नये, यासाठी कामांचे भूमिपूजन, उद्घाटन, उभारलेल्या वास्तूंच्या लोकार्पणाची कामे सध्या जोरात सुरू आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुमारे 1 हजार कोटींच्या कामांना सुरुवात होत आहे. काही कामे अपूर्ण असतानाही उद्घाटन करण्यात येत आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या निमित्ताने कामे उरकण्याची लगीनघाई सुरू असल्याचे दिसून येते.
सध्या लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील, त्यानंतर विधानसभेच्या आणि त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका तसेच महानगरपालिका निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या धामधूमीमध्ये मतदारसंघात कामाचे श्रेय नावावर करण्यासाठी धावपळ सुरू आहे. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील, आमदार जयंत पाटील, अरुण लाड, विश्वजित कदम, मानसिंगराव नाईक, विक्रमसिंह सावंत, सुमनताई पाटील यांनी विकासकामांचा धडाका लावला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
निवडणुकीच्या तोंडावर सुमारे एक हजार कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. या कामांची तत्काळ मंजुरी घेऊन कार्यवाही करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी कंबर कसली आहे. पालकमंत्री डॉ. खाडे यांच्या सांगलीत जिल्हा रुग्णालयासाठी मंजूर झालेल्या 46 कोटी आणि माता बाल संगोपन रुग्णालय या 100 खाटांच्या 36 कोटी रुपयांच्या दोन नुतन रुग्णालयांचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले.
राज्य परिवहन महामंडळाच्या मिरज येथील बस स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी 19 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्या कामाचे भूमिपूजनही पालकमंत्र्यांनी केले. काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा हरिपूर-कोथळी नवीन पुलाचे उद्घाटन बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झाले.
काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी बुर्ली-सूर्यगाव नवीन पुलाच्या कामाचे भूमिपूजन राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या उपस्थितीत केले. सांगली शहरात आ. गाडगीळ यांनीही विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाकाच सुरू केला आहे.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील (Jayant Patil), आ. मानसिंगराव नाईक, पुणे पदवीधरचे आमदार लाड, आमदार सावंत, सुमनताई पाटील (Suman Patil) यांच्याकडून मतदारसंघात जलजीवन मिशन योजना, रस्ते, नवीन पूल, उड्डाण पूल, पाणंद रस्त्यांसह विविध कामांचे उद्घाटन करीत आहेत. खानापूरचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्या मतदारसंघासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी रस्त्यांसाठी तब्बल 777 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यासाठी बाबर यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी प्रयत्न केले.
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदारसंघात एकाच दिवशी सात ते आठ कार्यक्रम होत आहेत. यानिमित्ताने जाहीर कार्यक्रम घेऊन विकासकामांचे मार्केटिंग करणे, याबाबत विरोधकांवर टीका केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारण तापू लागल्याचे चित्र दिसत आहे.
(Edited By : Sachin Waghmare)
R