abhijeet patil ranjitsingh naik nimbalkar shahajibapu patil devendra fadnavis sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shahajibapu Patil News : अभिजित पाटलांसाठी शहाजीबापूंची राजकीय बलिदानाची तयारी; पंढरपुरात केलं मोठं विधान

Akshay Sabale

Solapur News, 5 May : ऐन लोकसभा निवडणुकीत ( Lok Sabha Election 2024 ) सोलापूर ( Solapur ) आणि माढा मतदारसंघात ( Madha Lok Sabha Constituency ) महाविकास आघाडीला धक्का बसला. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी भाजपला पाठिंबा दर्शवल्यानंतर महाविकास आघाडीत खळबळ उडाली. अभिजित पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून पाहिलं जात होते. पण, भाजपला पाठिंबा दिल्यानंतर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून अभिजित पाटील यांच्या आमदारकीचे स्वप्न भंगलं आहे. यातच आमदार शहाजीबापू पाटील यांनी अभिजित पाटील यांना सांगोल्यातून लढण्याची ऑफर दिली आहे.

पंढरपुरातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांची सभा पार पडली. यावेळी रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, सोलापूरचे उमेदवार राम सातपुते ( Ram Satpute ) आणि महायुतीतील अन्य नेते उपस्थित होते. यावेळी शहाजीबापू पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांसमोर केलेल्या विधानानं चर्चांना उधाण आलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"आमच्या खुर्च्यां पुढं तुमच्या ( अभिजित पाटील ) ताब्यात यायच्या आहेत. नाही पंढरपुरातून कोणी तिकीट दिलं, तर सांगोल्याला चला. माझे गुडघे काम करत नाहीत. लग्नात भाच्याच्या मागे मामा उभे राहतो... तसाच मी अभिजित पाटील यांच्या पाठिमागे उभा आहे. कुणी सांगोल्यातून निवडून आणलं नाही, तर वडिलांचं नाव लावणार नाही. तुमच्या सगळ्या इच्छा आकांशा देवेंद्र फडणवीस पूर्ण करतील," असं म्हणत शहाजीबापू पाटील ( Shahajibaput Patil ) यांनी अभिजित पाटील यांना सांगोल्यातून निवडणूक लढण्याची ऑफर दिली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडण्यापूर्वी अभिजित पाटील यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला होता. यावेळी अभिजित पाटील यांचं विधानसभेचं तिकिट फायनल झाल्याचं बोललं जात होतं. त्यादृष्टीनं अभिजित पाटील तयारीही करत होते. तसेच, काही दिवसांपूर्वी अकलूज येथे धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रवेशावेळी 'मला आमदार झाल्यासारखं वाटतंय' असं विधान अभिजित पाटील यांनी केलं होतं.

मात्र, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचं गोडाऊन थकीत कर्जापोटी शिखर बँकेनं सील केलेलं. यानंतर जे आम्हाला मदत करतील, त्यांना आम्ही पाठिंबा देणार, अशी भूमिका घेत अभिजित पाटील यांनी भाजपला पाठिंबा दर्शवला.

दुसरीकडे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून समाधान आवताडे भाजपकडून विद्यमान आमदार आहेत. आवताडे यांनाच भाजपकडून पुन्हा पंढरपुरातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अभिजित पाटील यांच्या आमदारकीचं स्वप्न भंगलं आहे. पण, शहाजीबापू पाटील यांनी अभिजित पाटील यांना सांगोल्यातून लढण्याची ऑफर दिली आहे. आता अभिजित पाटील काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT