Sanjay Mandlik-Shahu Maharaj Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Lok Sabha Election: जनताच ठरवणार कोल्हापूर लोकसभेचा राजा; शाहू छत्रपती विरुद्ध मंडलिक सामना रंगणार

Rahul Gadkar

Kolhapur Lok Sabha Election 2024: मतदारांमध्ये असलेली नाराजी आणि कमी जनसंपर्क असल्याचा स्वकीयांनीच ठपका ठेवलेल्या खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) यांनी पुन्हा उमेदवारी मिळवून टीकाकारांना आणि अंतर्गत शत्रूंना प्रत्युत्तर दिले आहे. दहा दिवसांपूर्वी महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj Chhatrapati) यांना उमेदवारी दिल्यानंतर महायुतीमध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत संभ्रम तयार झाला होता. मात्र राजकीय दबाव तंत्र वापरून खासदार संजय मंडलिक हे पुन्हा उमेदवारी मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.

कोल्हापूर लोकसभेच्या मैदानात खासदार संजय मंडलिक विरुद्ध शाहू महाराज छत्रपती (Sanjay Mandalik Vs Shahu Maharaj Chhatrapati) असा सामना रंगणार आहे. हा सामना व्यक्तिगत नसला तरी वैचारिक मुद्द्यांवर गाजण्याची शक्यता आहे. श्रीमंत शाहू महाराज यांना कोल्हापूर जिल्ह्यात आदराचे स्थान आहे. करवीर संस्थांनाच्या गादीवरील ते महत्त्वाचे छत्रपती राजे आहेत. तर स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक (Sadashivarao Mandalik) व आजूबाजूचे जेष्ठ सहकारी हे प्रेमाने खासदार संजय मंडलिक यांना राजा नावाने पुकारतात. आता या लोकसभा निवडणुकीतच कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत (Kolhapur Lok Sabha Election) जनतेचा राजा कोण ठरणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मागील लोकसभा निवडणुकीत 'आमचं ठरलंय' या फॅक्टरमुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही राज्यात नाही तर देशात गाजली. यंदा हा फॅक्टर चालेल की नाही याची शक्यता फारच कमी आहे. कारण मागील निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात असणारे नेते हे एकत्र राहून प्रचाराच्या निमित्ताने खांद्याला खांदा लावून मैदानात उतरणार आहेत. राज्यातील सत्ता नाट्यानंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात महत्त्वपूर्ण बदल झालेत. सहापैकी चार विधानसभा मतदारसंघात महायुतीचे बलस्थाने कायम आहेत. मात्र महाविकास आघाडीने शाहू महाराज यांच्या रूपाने टाकलेल्या डावानंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील जनता कोल्हापूरच्या छत्रपतींच्या सोबत राहणार की पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या स्वप्नाला साध घालणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. वरवर शाहू महाराज यांच्या बद्दल आदर दिसत असला तरी पंतप्रधान मोदी यांच्याबद्दलची भावना लोकांच्या मनात अधिक आहे. काँग्रेसकडून (Congress) पंतप्रधान पदासाठी सक्षम चेहरा अद्याप समोर न आल्याने त्याचा फटकाही काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार काँग्रेसचे आहेत. महाविकास आघाडीसाठी (MVA) ही बलस्थान आहेत. शिवाय इतर विधानसभा मतदारसंघात शाहू महाराज यांच्याबद्दल आदर असणारा प्रचंड मतदार महाविकास आघाडीच्या बाजूने असणार आहे. त्याचबरोबर राधानगरी, कागल, चंदगड, हे एकतर्फी महायुतीच्या सोबत असणारे मतदारसंघ आहेत. मात्र सहा विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीची जोडणी ही विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवरच करावी लागणार आहे. त्याचे आव्हान जिल्ह्यातील सर्वच नेत्यांसमोर असणार आहे.

महायुतीमधील सर्वच लोकप्रतिनिधींवर विधानसभेतील विरोधकांना या लोकसभा निवडणुकीत एकत्र करण्याचे आव्हान पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), विद्यमान खासदार संजय मंडलिक, यांच्यासमोर आहे. शिवाय विधानसभेला त्यांची भूमिका काय असणार हे सांगणेदेखील कठीण आहे. अशा परिस्थितीत महायुती या लोकसभा निवडणुकीत कोणते डावपेच आखून महायुतीतील भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादीतील नेत्यांना एकसंघ करून निवडणुकीला सामोरे जाईल हे पाहणे महत्त्वाचे आहे.

बाप बेटा- बेटा बाप

2009 च्या लोकसभा निवडणुकीत स्वर्गीय लोकनेते सदाशिवराव मंडलिक हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होते. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून युवराज संभाजीराजे छत्रपती (SambhajiRaje Chhatrapati) हे निवडणुकीच्या रिंगणात होते. यावेळी स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी विजय मिळवला होता. आता याचाच वचपा श्रीमंत शाहू महाराज छत्रपती काढणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण युवराज संभाजी राजे छत्रपती यांचे वडील स्वतः या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर त्यांच्या विरोधात स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांचे चिरंजीव खासदार संजय मंडलिक हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT