Satara News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Congress News : सातारा, सांगली आणि कोल्हापूरमधील उमेदवारांसाठी काँग्रेसने घातली 'ही' अट?

Lok Sabha Election Congress Clears Stand for Satara Sangli and Kolhapur Candidate : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात काँग्रेस पदाधिकारी बैठक झाली. या बैठकीत सातारा सांगली आणि कोल्हापूरमधील उमेदवारांबाबत महत्त्वाची भूमिका घेण्यात आली...

उमेश भांबरे :सरकारनामा

Satara Congress News :

साताऱ्यात झालेल्या काँग्रेसच्या सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात आले आहे. सातारा, सांगली व कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या विचारांचा उमेदवार द्यावा. त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही घेऊ, अशी आग्रही मागणी तीन जिल्ह्यातील काँग्रेसच्या विधानसभा निरीक्षक, तालुकाध्यक्षांनी काँग्रेसच्या सचिव सोनलबेन पटेल यांच्याकडे केली.

आगामी Lok Sabha Election 2024 साठी सर्वच राजकीय पक्षांनी दंड थोपटले आहेत. सध्या केंद्रात लोकसभा निवडणुकी च्या अनुषंगाने भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. वेगवेगळ्या मंत्र्यांचे राजकीय दौरे सुरू आहेत. असे असताना आता काँग्रेस पक्षानेही साताऱ्यातून आपले रणशिंग फुंकले आहे.

प्रदेश काँग्रेस कमिटी आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री सतेज पाटील आणि विश्वजित कदम यांच्या सूचनेवरून विधानसभा मतदारसंघ प्रभारींची नियुक्ती करण्यात आली आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील निरीक्षक आणि तालुकाध्यक्षांची गुरुवारी महत्त्वपूर्ण आढावा बैठक सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीत झाली. या बैठकीत लोकसभा मतदारसंघाचा आढावा काँग्रेसच्या सचिव सोनलबेन पटेल यांनी घेतला.

तिन्ही जिल्ह्यांतील विधानसभा निरीक्षक, तालुकाध्यक्षांकडून लोकसभा मतदारसंघ व विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. गावागावात काँग्रेसच्या विचारांचे लोक आजही आहेत. साताऱ्यात काँग्रेसचा एक आमदार, सांगलीत दोन तर कोल्हापुरात पाच आमदार तर दोन विधानपरिषद सदस्य, असे सात आमदार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आजही काँग्रेसच्या विचाराचे लोक प्रत्येक गावागावात आहेत. त्यामुळे सातारा, सांगली व कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांत महाविकास आघाडीच्या पक्षांशी बोलून काँग्रेस विचाराचा उमेदवार देण्यात यावा, त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची राहिल, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावर सोनल पटेल यांनी या आढावा बैठकीचा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठवला जाईल, असे सांगितले.

तर पंचायत समिती स्तरावर तात्काळ बैठक घेऊन त्यांचा अहवाल जिल्हाध्यक्षांना आठ दिवसांत सादर करा, पक्षवाढीसाठी पुढाकार घ्या, जे कोणते सेल, कमिट्या अपूर्ण आहेत त्या तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी केल्या. यावेळी जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण-पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, ज्येष्ठ नेते अॅड. विजयराव कणसे, उदयसिंह पाटील-उंडाळकर, अजितराव पाटील-चिखलीकर, राजेंद्र शेलार, महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, नरेश देसाई आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT