Sangali News : गेल्या वर्षभर भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात काम केल्यानंतर शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी भारतीय जवान किसान पार्टी स्थापन करुन लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. स्वतः हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून लढणार असल्याचे सांगत सांगलीतून पांडुरंग भोसले यांच्या नावाची घोषणा त्यांनी गुरुवारी केली. त्यामुळे रघुनाथदादांनी बीआरएसला सोडचिठ्ठी दिल्याचे स्पष्ट झाले.
शेतकरी संघटनेच्या माध्यमातून देशभर काम करणारे रघुनाथदादांनी गेल्या वर्षी तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश केला होता. बीआरएस या प्रादेशिक पक्षाने राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी महाराष्ट्रात सुरुवात केली होती. आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच अनेक नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत.
या सगळ्याच निवडणूकांच्या मैदानात उतरुन पक्षाला राष्ट्रीय पक्ष अशी ओळख निर्माण करून देण्याचा केसीआर (KCR) नेतृत्वाचा प्रयत्न होता. परंतु, गतवर्षी झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत बीआरएसचा दारुण पराभव झाला होता. तेथे काँग्रेसची सत्ता आल्याने बीआरएस पक्ष सत्तेबाहेर गेला. त्याचा परिणाम आता राज्यातही होत असल्याचे चित्र दिसत आहे.
सांगली जिल्ह्यातून रघुनाथ पाटील (Raghunath Patil) यांनी बीआरएस (BRS) पक्ष पसरविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु जिल्ह्यात म्हणावे तसे यश आले नाही. तेलंगणातही सत्ता नसल्याने बीआरएसला आगामी काळात जम बसवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार असल्याचे अटळ होते. केवळ तेलंगणात शेतकरी धोरण राबविले आणि ते केले हे सांगून राज्यातील मत मिळवणे अवघड असल्याचे चित्र निर्माण झाले होते. या कारणांनी गेल्या काही दिवसांपासून बीआरएसऐवजी रघुनाथदादांनी भारतीय किसान जवान पार्टीची स्थापना केली होती. या माध्यमातून पुन्हा शेतकर्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शेतकर्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर भारतीय जवान किसान पार्टी हाच पर्याय आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुका किसान पार्टीने लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे पाटील यांनी जाहीर केले.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघामधून स्वतः हे लढणार आहेत, तर सांगलीतून पांडुरंग भोसले यांना तिकीट देण्यात आले असल्याचे त्यांनी जाहीर केले. 2019 मध्येही शेतकरी संघटनेचे नेते पाटील यांनी हातकणंगलेतून निवडणूक लढवली होती, आता पुन्हा भारतीय जवान पार्टीच्या माध्यमातून त्यांनी हातकणंगलेमधून रणशिंग फुंकल्याचे स्पष्ट झाले.