Jayant Patil Vs Ajit Pawar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha Election 2024 : अजितदादा वाढवणार जयंत पाटलांचं टेन्शन; सांगलीत करणार शक्तिप्रदर्शन

Anil Kadam

Sangali News : गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा सांगली दौरा झाला. पवार साहेब परतताच सांगली जिल्ह्यात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्याची तयारी सुरू झाली आहे. 5 फेब्रुवारीला विटा आणि जत येथे शेतकरी मेळावा घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. जिल्हाध्यक्ष वैभव पाटील तालुका दौरे करून शक्तीप्रदर्शनाची तयारी करीत आहेत. या मेळाव्यामध्ये अन्य पक्षातील काही नेते अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. याशिवाय काही माजी आमदारांची ही चाचपणी केली जात आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री जत तालुक्याच्या पूर्व भागातील वंचित 65 गावांची विस्तारित योजना मार्गी लावण्यासाठी तालुकाध्यक्षांनी कंबर कसली आहे. (Loksabha Election 2024)

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सांगली जिल्ह्यातील राजकारणही बदलत आहे. शरद पवार यांच्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फारकत घेऊन एकनाथ शिंदे आणि भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवार यांचा राज्याच्या विविध भागात गट पाय पसरत आहे. सांगली जिल्ह्यातही अजितदादा गटाने स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा चंग बांधला आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सांगली जिल्ह्यातील असले तरीही त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न अजितदादा गटाकडून केला जात आहे.

या परिस्थितीत गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सांगली जिल्ह्याचा दौरा केला. महानगरपालिकेने बांधलेल्या राजारामबापू पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्ह्यातील नेत्यांना जयंत पाटील यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण काहीसे थंडावले होते.

साहेब परतल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित दादांच्या दौऱ्याची जिल्ह्यात तयारी सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) हे पहिल्यांदाच सांगलीत येणार असल्याने शेतकरी मेळाव्याचे पक्ष प्रवेशाचेही नियोजन करण्यात येत आहे. जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांच्याकडून तालुका दौरे सुरू करण्यात आले आहेत. काही नेते आणि दुसरा फायदा येथील कार्यकर्त्यांना दादांसोबत येण्याचे आवाहन त्यांच्याकडून केले जात आहे. पाटील यांच्या नेतृत्वाखाली विटा येथे होणाऱ्या मेळाव्यामध्ये काही राजकीय प्रवेश होण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, अद्याप त्यांच्या गळाला बडा मासा लागलेला नाही. त्यामुळे दादा गटाचे पदाधिकारी काही माजी आमदारांनाही साद घालत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शेतकरी मेळाव्याचे आयोजन

माजी आमदार विलासराव जगताप (Vilasrao jagtap) यांचे कट्टर समर्थक सुनील पवार यांनी भाजपशी फारकत घेऊन अजितदादा गटात प्रवेश केला. त्यानंतर तात्काळ त्यांना तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी जतमध्ये शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. राज्याच्या विकासातील करारी व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले अजितदादा हेच दुष्काळी तालुक्याचा सर्वांगीण विकास करू शकत असल्याने त्यांच्या हस्ते करगणी-शेटफळे रस्ते कामाचा शुभारंभ केला जाईल. जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी रात्रीचा दिवस करून जत तालुक्यात राष्ट्रवादी एक नंबरला आणण्याचा चंग बांधला आहे.

आणखी काही नेते मंडळी प्रवेश करणार

दुष्काळी भागाच्या प्रश्नांची जाण त्यांना आहे. जत तालुक्यातील म्हैसाळ विस्तारित योजना पूर्ण करण्याचा शब्द दिला आहे. पवार यांच्याकडे अर्थखाते आहे. जतच्या सर्वांगीण विकासासाठी तेच मदत करू शकतात, असा विश्वास तालुक्यातील जनतेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी बरोबर काम करण्यासाठी तालुक्यातीत अनेक पदाधिकारी इच्छुक आहेत. सध्या मोजक्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला असला तरी अजितदादांच्या उपस्थितीत आणखी काही नेते मंडळी प्रवेश करतील, असा तालुकाध्यक्षांना विश्वास आहे.

(Edited by Sachin waghmare)

SCROLL FOR NEXT