Kolhapur Political News : हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी एकला चलोचा नारा दिला. कालपर्यंत राजू शेट्टी हे महाविकास आघाडी किंवा महायुतीसोबत जाणार नाही, असे छातीठोकपणे सांगत होते. मात्र, पाठिंबा देतील त्यांना राज्यात मदत करणार असल्याचे जाहीरपणे सांगत शेट्टींनी (Raju Shetti) दोन्हीही आघाड्यांना खेळवत ठेवण्याचे काम केले होते. शेट्टींना आपल्याकडे घेण्यासाठी आघाडीने प्रयत्न केले, मात्र ते भूमिकेवर ठाम होते. आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाने हबकी डाव टाकल्याने शेट्टींची अस्वस्थता वाढली. या डावानंतर राजू शेट्टींनी तातडीने मातोश्री गाठल्याची माहिती आहे. Raju Shetti @ Matoshri
स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Sanghtana) महायुतीसोबत येणार नसल्याची खात्री झाल्यानंतर ठाकरे गटाने हातकणंगले मतदारसंघात उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शनिवारी सकाळी मुंबईकडे प्रस्थान केले. ते दुपारी तीन वाजता मातोश्रीवर दाखल झाले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा केल्याचे समजते आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गेल्या महिनाभरापासून राजू शेट्टींच्या धर-सोड भूमिकेमुळे ठाकरे गटाने हातकणंगलेत (Hatkanagle) उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्या संदर्भात त्यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मातोश्रीवर घेतली होती. त्यानंतर महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची बैठक कोल्हापुरात पार पडली. या बैठकीत हातकणंगले मतदारसंघात ठाकरे गटाकडून उमेदवार देण्यावर एकमत झाले होते.
2014 च्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीतील घटक पक्ष होती. त्यावेळी त्या ठिकाणी राजू शेट्टी विजयी झाले होते. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ते आघाडीसोबत राहिल्याने आणि वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिल्याने झालेल्या मत विभाजनाचा फटका शेट्टींना बसला होता. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कोणताही फटका बसू नये, याची खबरदारी शेट्टी घेताना दिसत आहेत. मात्र, कोणत्याही पक्षासोबत न जाण्याचा निर्णय शेट्टी यांनी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर नेमकी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत काय चर्चा होणार? याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.
(Edited by Sunil Dhumal)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.