Pune Political News : भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुणे लोकसभेचे तिकीट मिळालेले महायुतीचे उमेदवार आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची शनिवारी भेट घेतली. मुळीक यांच्या घरी जाऊन मोहोळ यांनी त्यांची गळाभेट घेत आगामी लोकसभेच्या निवडणुकीत सक्रिय होण्याचे आवाहन केली.
पुणे लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यासह वडगाव शेरी विधानसभेचे माजी आमदार आणि पुणे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक हे इच्छुक होते. गेल्या काही महिन्यांपासून खासदारकीची उमेदवारी आपल्याला मिळावी, यासाठी ते दोघे तयारीला लागले होते. त्यांनी शहरात जोरदार कार्यक्रम घेतले होते. यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होता.
लोकसभेसाठी (Pune Lok Sabha) या दोघा इच्छुकांनी जोरदार फिल्डिंगदेखील लावली होती. राज्य तसेच केंद्रातील पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमार्फत उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न केले जात होते. त्यांनी तयारी सुरू केली असली तरी लोकसभेसाठी इच्छुक आहोत, असे त्यांनी वक्तव्य केले नाही. पक्षाने आदेश दिल्यास लोकसभेची निवडणूक लढविणार, असे दोघांनी वारंवार स्पष्ट केले होते. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच्या यादीत मुरलीधर मोहोळ आणि जगदीश मुळीक या दोघांची नावे होती. मात्र, अखेरच्या टप्प्यात मोहोळ यांनी आघाडी घेत उमेदवारी मिळवण्यात बाजी मारली.
लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये तसेच दुसऱ्या दिवशी मोहोळ यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम झाला . या दोन्ही कार्यक्रमांमध्ये जगदीश मुळीक (Jagdish Mulik) हे अनुपस्थित होते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती. भाजपमध्ये कोणतीही नाराजी नाही, मुळीकदेखील आपल्या प्रचारामध्ये सहभागी होऊन मदत करतील, असा दावा मोहोळ यांनी केला होता, तर उमेदवारी जाहीर झालेल्या दुसऱ्या दिवशी मुळीक यांनी आपल्या सोशल मीडियावर नागरिकांच्या आभाराची पोस्ट टाकत सहानुभूती मिळवली होती. त्यामध्ये आपण नाराज असल्याचा उल्लेख त्यांनी केला नाही.
भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी शनिवारी सकाळी वडगाव शेरी येथील जगदीश मुळीक यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. या वेळी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. उमेदवारी मिळाल्यानंतर मोहोळ यांनी स्वतः मुळीक यांच्या घरी जाऊन घेतलेली भेट ही चर्चेचा विषय ठरत आहे. मुळीक यांची भेट घेत लोकसभेच्या निवडणुकीत आवश्यक ती मदत करण्याची विनंती मोहोळ यांनी त्यांना केली. त्यावर पक्षाचा विजय निश्चित आहे अ,से आश्वासन मुळीक यांनी मोहोळ यांना दिल्याचे समजते. मोहोळ यांनी घेतलेल्या भेटीमुळे या दोन्ही नेत्यांमधील मतभेद हेवेदावे दूर झाले आहेत की नाही, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.
(Edited by Sunil Dhumal)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.