Prithviraj Deshmukh, Sanjaykaka Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha Election 2024 : सांगलीत भाजप उमेदवाराचा सस्पेन्स कायम; संजयकाकांच्या 'त्या' वक्तव्याने कार्यकर्ते संभ्रमात

Anil Kadam

Sangli Political News :

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर व्हायला काही दिवस उरलेत. असे असले तरी सांगली लोकसभा मतदारसंघात ताकदवान पक्ष असलेल्या भाजपमधील उमेदवारीचा घोळ अद्याप संपलेला नाही. विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्यासह माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनीही शड्डू ठोकला आहे, तर खासदार संजयकाका यांनी पक्ष देईल त्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे जाहीर सभेत विधान केल्याने भाजपच्या उमेदवारीवर संभ्रम निर्माण झाला आहे. भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नाही, त्यामुळे आता अमित शाहांच्या एन्ट्रीनंतर दुसऱ्या यादीकडे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणूक (Loksabha Election) पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यात लोकसभेसाठी एप्रिल महिन्यात मतदान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्ष आणि जाहीर होणाऱ्या उमेदवाराला मार्च तसेच एप्रिलमधील काही दिवस प्रचारासाठी मिळणार आहेत. या 40 ते 50 दिवसांत उमेदवारांना विजयापर्यंत पोहाेचण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघ (Sangli Loksabha Constituency) पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, गेल्या दहा वर्षांत हा बालेकिल्ला ढासळला आहे. भाजपचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांनी काँग्रेसचा पराभव करत मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. त्यामुळे मतदारसंघात भाजपची ताकद जास्त आहे. या उलट काँग्रेसमध्ये असलेली गटबाजी, राष्ट्रवादीत पडलेली फूट, यामध्ये काँग्रेसचे कार्यकर्तेदेखील विस्कटले आहेत. याचा फायदा पुन्हा भाजपला मिळणार असताना भाजपकडून उमेदवारीचा घोळ सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

भाजपकडून खासदार संजयकाका पाटील (Sanjay Patil), माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी उमेदवारी मागितली आहे, तर जिल्ह्यातील एका बड्या नेत्याचा मुलगा भाजपमध्ये येऊ शकतो. त्याला सांगली लोकसभेची उमेदवारी मिळू शकते, अशी शक्यता सांगितली जाते. पण सध्या तरी संजयकाका पाटील आणि पृथ्वीराज देशमुख यांच्यामध्ये उमेदवारीवरून चुरस निर्माण झाली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार संजयकाका पाटील यांना भाजपची (BJP) उमेदवारी मिळू नये, यासाठी त्यांच्या पक्षातील काही लोक पुढे होते. मात्र, ऐनवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी करत भाजपमधील अंतर्गत संघर्ष थांबवला आणि काकांना पुन्हा उमेदवारी दिली. त्यानंतर काका दुसऱ्यांदा खासदार झाले पण, पक्षातील संघर्ष कायम राहिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपमधील एक गट संजयकाका पाटील यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी करत आहेत. पालकमंत्री सुरेश खाडे हे खासदार संजयकाका यांच्या बाजूने आहेत, पण इतर अनेक नेते मंडळी काकांना विरोध करत आहेत, तर दुसरीकडे काही नेते काका सोडून कुणालाही पक्षाने उमेदवारी द्यावी, अशी मागणी करू लागले आहेत.

केंद्रीय तसेच राज्य पातळीवरील सर्वेक्षणामध्ये सांगलीची जागा धोक्यात दाखवली होती. हरिपूर येथे पक्षाचा मेळावा झाला पडला. या मेळाव्यासाठी मध्य प्रदेशचे कामगारमंत्री प्रल्हादसिंग पटेल उपस्थित होते. या मेळाव्यात खासदार संजयकाका पाटील यांनी भाजपचा विजय निश्चित आहे. पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी कार्यकर्त्यांनी उभे राहावे, असे आवाहन केले होते. यामुळे पक्षात पुन्हा संभ्रम वाढला आहे.

संजयकाकांना उमेदवारी मिळाली आहे का? उमेदवारी फिक्स झाली असेल तर प्रदेश पातळीवर अद्याप ग्रीन सिग्नल का मिळाला नाही? त्यामुळे भाजप उमेदवार बदलणार की काय? अशी चर्चा आता भाजप कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे, तर दुसरीकडे उमेदवारी मिळाली तर भाजपमधील अंतर्गत नाराजी थांबविण्यासाठी ते हे बोलले असतील काय? असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.

(Edited by Avinash Chandane)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT