Sangli Political News : सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे दोन आमदार आहेत, पक्षाने गेल्या वर्षभरापासून जोरदार ताकदीने प्रचार सुरू केला आहे, गतवेळीसारखी जागा सोडण्याची चूक नको, जागा काँग्रेसलाच हवी अशी जोरदार मागणी काँग्रेसच्या (Congress) पदाधिकार्यांनी मुंबईत पक्षश्रेष्ठींसमोर केली. सांगलीची जागा सोडण्यासंदर्भात कसलीही चर्चा नाही. तुम्ही कामाला लागा, अशा सूचना काँग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांनी जिल्ह्यातील नेत्यांना दिल्या.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 19 लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी मुंबई टिळक भवनमध्ये बैठक घेतली. जिल्ह्यातील नेते आमदार विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam), जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जयश्री पाटील यांनी बाजू मांडली. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली शिवसेनेला सोडण्याचा विषय आता थांबवा, अशी आग्रही भूमिका मांडण्यात आली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सांगली लोकसभा (Sangli Loksabha) काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे दोन आमदार आहेत. 2019 च्या निवडणुकीत जागा सोडण्याची चूक काँग्रेसने केली. या निवडणुकीत देखील कोल्हापूरच्या (Kolhapur) बदल्यात सांगलीची जागा सोडण्याबाबत चर्चा सुरू आहे. ही चर्चा आता बंद करावी. यावेळी निर्धाराने लढून जिंकणार आहोत. त्यामुळे आम्हाला कामाला लागू द्या, अशी मागणी अनेक मान्यवरांनी केली.
आमदार विश्वजीत कदम यांनी तर काँग्रेसच्या (Congress) नेत्यांना चांगलेच बोल सुनावले. माझ्या नेतृत्वात ही निवडणूक होत असताना आपला उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहे. मला पक्षश्रेष्ठींनी ही निवडणूक लढवण्याचा आग्रह केला, मात्र मी विशाल यांना शब्द दिला आहे. त्यांना उमेदवारी देवू, आम्ही त्यांना एकजुटीने निवडून आणू. गेल्यावर्षीची पुन्हा चूक यावेळी नको.
आमदार विक्रमसिंह सावंत (Vikramsingh Savant) म्हणाले, जिल्ह्यात वातावरण खूप चांगले आहे. काँग्रेसला विजयाच्या पूर्ण संधी आहेत. यावेळी वेगळा विचार करू नका. हा पुन्हा बालेकिल्ला बनवून दाखवू. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले, आमदार विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एकमुखाने विशाल पाटील (Vishal Patil) यांचे नाव दिले आहे. त्यांची उमेदवारी लवकर जाहीर करावी.
विशाल पाटील म्हणाले, भाजपसमोर (BJP) आम्ही एकसंघपणे आव्हान उभे केले आहे. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वात आमची मजबूत एकजूट झाली आहे. ते आमचे नेते आहेत. तुम्ही उमेदवार ठरवा. मी पक्षाशी बांधिल असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवाय ही जागा शिवसेनेला (Shivsena) सोडली तर मी लढणार नसल्याची भमिका त्यांनी मांडली. तर सांगली लोकसभा जागा ही काँग्रेसचीच आहे, तिकडे लक्ष देऊ नका, कामाला लागा, अशा सूचना काँग्रेसच्या राज्यातील बड्या नेत्यांनी जिल्ह्यातील नेत्यांना दिल्या.
विशाल पाटील (Vishal Patil) यांनी आमदार विश्वजित कदम यांचे नेतृत्व मान्य करत असल्याचे सांगितले, तोच धागा पकडून डॉ. कदम म्हणाले, ही जागा विशाल पाटील लढवतील व आम्ही त्यांना सर्व ताकदीने, एकजुटीने निवडून आणू.
मात्र विशाल पाटील यांनीही हीच पद्धत कायम ठेऊन यापुढे लोकसभा निवडणुकीत मदत करणार्यांना ताकद द्यावी, जुने अनुभव चांगले नाहीत, ते पुन्हा येता कामा नयेत, अशी ग्वाही सर्वांसमोर द्या, अशी मागणी विश्वजीत कदम यांनी केली. विशाल यांनी लक्षात होकार देत ‘पर्मनंट एकी’ असे सांगत त्यांना प्रतिसाद दिला.
Edited By : Rashmi Mane
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.