Sanjay Patil-Chandrahar Patil-Vishal Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Tasgaon Politics : संजय पाटलांना होमग्राउंडमध्येच अडकवण्याचा डाव; विशाल अन्‌ चंद्रहार पाटलांनी तासगावमध्ये घातले लक्ष

Anil Kadam

Sangli News : लोकसभा निवडणूक जवळ आल्याने तासगाव तालुक्यातील राजकीय हालचाली वाढल्या आहेत. खासदार संजय पाटील यांचे होमग्राउंड असलेल्या तालुक्यात काँग्रेसचे विशाल पाटील आणि डब्बल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचे दौरे वाढले आहेत. संजयकाकांच्या बालेकिल्ल्यात कार्यक्रम, समारंभ, लग्न, जयंत्या अशा कार्यक्रमासाठी ठिकठिकाणी भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे विरोधकांनी खासदारांचा बालेकिल्ला टार्गेट केल्याचे दिसून येते.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे.भाजपचे खासदार संजय पाटील (MP Sanjay Patil) यांचा तासगाव तालुका बालेकिल्ला आहे. गत दोन निवडणुकांमध्ये तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून त्यांनी एकतर्फी आघाडी घेतली होती, 'आपलाच खासदार, आपलाच आमदार,' असे म्हणत तासगाव तालुका खासदार संजय पाटील यांच्या मागे उभा होता. मात्र, मागील पाच वर्षांत अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) आता अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने विरोधकांनी संजयकाकांचा बालेकिल्ला घेरला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार संजय पाटील यांच्या विरोधात यावेळी पुन्हा एकदा विशाल पाटील (Vishal Patil) यांच्यासह अद्याप पक्ष न ठरलेले चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांनी शड्डू ठोकला आहे. या दोघांनीही सध्या तासगाव तालुक्यावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. गावोगावच्या कार्यकर्त्यांचे वाढदिवस, लग्न समारंभ, जयंती, उत्सव या माध्यमातून संपर्क वाढविला आहे. तासगाव शहरासह ग्रामीण भागात काही दिवसांपूर्वी शिवजयंती उत्सवाच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या चंद्रहार पाटील यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरत आहे. त्याशिवाय राजकीय बैठकाही सुरू झाल्या आहेत.

काँग्रेसचे संभाव्य उमेदवार विशाल पाटील यांच्यासह त्यांच्या पत्नी पुजा यांनी अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित करून महिला मतदारांशी संवाद साधत आहेत. या बैठका प्राथमिक स्वरुपाच्या असल्या तरी त्यातून अंदाज घेतले जाऊ लागले आहेत. ओळख काढून भेटीगाठी घेतल्या जात आहेत. विशाल पाटील यांचा पूर्वीपासून राष्ट्रवादीशी संबंध आहेच. मात्र, चंद्रहार पाटील यांनीही टार्गेट केल्याचे सध्या सुरू भेटीगाठीवरून चित्र दिसत आहे.

काका आणि आबा गटात पुन्हा टोकाचा संघर्ष

मागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये काका आणि आबा गटात समझोता दिसत होता. मात्र, गेल्या चार साडेचार वर्षांत दोन्ही गटात पुन्हा एकदा टोकाचा राजकीय संघर्ष सुरू आहे. त्याचा परिणाम या निवडणुकीत ठळकपणे दिसणार आहे. ‘आमचा खासदार...आमचाच आमदार' या घोषवाक्याला यावेळी कलाटणी मिळणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तासगाव (Tasgaon) तालुक्यातील मते मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT