Ajit Pawar, Devendra Fadnavis Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha News 2024 : माढा, साताऱ्यात उमेदवार फडणवीसांचा, मात्र 'डाव' अजित पवार टाकणार?

Satara, Madha Loksabha News : सातारा व माढा लोकसभा मतदारसंघांवरून महायुतीत भाजप आणि राष्ट्रवादीत वाद निर्माण झाल्याचं बोललं जात आहे.

उमेश भांबरे :सरकारनामा

Mahayuti Loksabha Election 2024 : सातारा व माढा लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत भाजप व अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद निर्माण झाला आहे. साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले, तर माढ्यात रणजितसिंह नाईक निंबाळक़र यांना विरोध होत आहेत.

तरीही भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढ्यातून उमेदवारी दिली, तर उदयनराजेंना तिकिटाची गॅरंटी दिली आहे. यावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रचंड नाराजी पसरली आहे. याचा परिणाम अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मतांचे विभाजनावर होऊन ही मते शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळण्याची भीती व्यक्त होत आहे.

लोकसभा निवडणुकीत यावेळेस सातारा, माढा लोकसभा मतदारसंघास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण या दोन्ही जागांचा तिढा सोडविण्यात भाजपचे राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांना यश आले आहे. माढा लोकसभेसाठी भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. तरीही त्यांच्यापुढे निवडून येण्याची अडचण निर्माण झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विधान परिषदेचे माजी सभापती व राष्ट्रवादी अजित पवार(Ajit Pawar) गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळक़र यांनी तर खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना मदत न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मताधिक्य कमी झाल्यास आम्हाला विचारू नका, असा इशाराही दिला आहे. तर शिंदे गट शिवसेनेचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी खासदार निंबाळकर यांना विरोध करत ही उमेदवारी बदलावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात वातावरण वाढत आहे.

तर दुसरीकडे साताऱ्यातून उदयनराजे भोसले(Udayanraje Bhosle) यांना उमेदवारी देण्याबाबतची गॅरंटी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. पण, त्यावर शिक्कामोर्तब केलेले नाही, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सातारा लोकसभा मतदारसंघावर आमचाच दावा असून हा मतदारसंघ आम्ही सोडणार नाही, असा टोकाचा इशारा दिला आहे.

दरम्यान, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मंगळवारी पुण्यात बैठक होणार असून, यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा होणार आहे. तसेच या वेळी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीच्या सातारा जिल्ह्यातील आमदारांना पुण्यात बोलावले आहे. सध्यातरी सातारा व माढा मतदारसंघावरून राष्ट्रवादीत नाराजीचा सूर असल्याने दोन्ही पैकी एक जागा सोडावी, अशी आग्रही मागणी अजित पवारांपुढे त्यांचे आमदार करणार आहेत.

परिणामी, अजित पवार व त्यांच्या नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी अमित शाह साताऱ्याचा की माढ्याचा निर्णय बदलणार याची उत्सुकता आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला माढा व साताऱ्यात डावलले गेल्यास त्याचा परिणाम महायुतीच्या उमेवाराच्या मताधिक्यावर होणार असून, राष्ट्रवादीची मते शरद पवारांच्या उमेदवारकडे जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT