Jaykumar Gore Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jaykumar Gore : राष्ट्रवादीच्या 9 शिलेदारांनी भाजपच्या मंत्र्याची झोप उडवली : जयकुमार गोरेंच्या बालेकिल्ल्यात 'हाय व्होल्टेज ड्रामा'

Jaykumar Gore : माण-खटाव बाजार समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून भाजपचे मंत्री जयकुमार गोरे समर्थक व राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक पॅनेल यांच्यात चुरशीचा संघर्ष झाला असून राजकीय वातावरण तापले आहे.

रुपेश कदम

दहिवडी : माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत 'हाय व्होल्टेज ड्रामा' बघायला मिळाला. सभापती निवडीसाठी बोलविण्यात आलेली सभा गणपूर्ती न झाल्याने तहकूब करण्यात आली. यावेळी नियमांचा काथ्याकूट करण्यात आला. उपस्थित राष्ट्रवादी समर्थक संचालकांनी प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला. तर भाजप समर्थक सर्व संचालक अनुपस्थित राहिले.

बाजार समितीच्या संचालक पदासाठी २०२१ साली निवडणुक झाली होती. २० ऑगस्ट २०२१ रोजी झालेल्या सभापती निवडीत भाजप समर्थक विलासराव देशमुख हे १० विरुद्ध ७ मतांनी निवडून आले होते. पॅनेल अंतर्गत सहकाऱ्याला संधी देण्यासाठी विलासराव देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारा यांनी बाजार समितीच्या उर्वरीत कालावधीसाठी सभापती पदासाठी निवडणूक जाहीर केली.

या निवडीसाठी अध्यासी अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दहिवडी, धनाजी काळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार १३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२:३० वाजता बाजार समितीच्या दहिवडी येथील मुख्य कार्यालयात सभा आयोजित करण्यात आली होती. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाचे आरक्षण जाहीर झाल्याच्या दिवशीच बाजार समितीच्या सभापतींच्या निवडीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

सकाळपर्यंत भाजप समर्थक पॅनेलचे संचालक आपलाच सभापती होणार या भ्रमात होते. मात्र इथेच घोळ झाला. अगदी अनपेक्षितपणे राष्ट्रवादीने आपला मेळ करत समर्थक संचालकांची संख्या नऊ केली. बाळकृष्ण काळे, कुंडलिक भोसले, सुर्याजीराव जगदाळे, योगेश भोसले, रामचंद्र कदम, किसन सावंत, रामचंद्र झिमल यांनी पंजाबराव पोळ व रमेश यादव यांनाही सोबत घेतले. दोन्ही पॅनेलची सदस्य संख्या नऊ, नऊ झाल्याने भाजप समर्थक पॅनेलसाठी हा खूप मोठा धक्का होता.

सभापती निवडीसाठी राष्ट्रवादी समर्थक पॅनेलचे नऊ संचालक वेळेत उपस्थित होते. त्यामुळे भाजप समर्थक पॅनेलचा एकही संचालक उपस्थित राहिला नाही. गणपूर्ती न झाल्याने अध्यासी अधिकारी धनाजी काळे यांनी सभा तहकूब केली. गणपूर्तीसाठी 9 + 1 अशी संख्या आवश्यक होती. यावर उपस्थित संचालकांनी आक्षेप घेतला. जवळपास चार तास नियमांचा काथ्याकूट करण्यात आला. मात्र अधिकारी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले व जिल्हा उपनिबंधकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील प्रक्रिया होईल असे त्यांनी घोषित केले.

भाजपने शिताफीने निवड टाळली :

राष्ट्रवादी समर्थक पॅनेलचे नऊ संचालक होऊ शकतील असा विचारही भाजप समर्थक पॅनेलच्या संचालकांनी केला नव्हता. पण राष्ट्रवादीचे नऊ समर्थक वेळेत उपस्थित राहिल्याने भाजप समर्थक एकही संचालक उपस्थित राहिला नाही. परिणामी सभा तहकूब करावी लागली. दोन्ही बाजूंचे नऊ, नऊ संचालक उपस्थित राहिले असते तर सभापतींची निवड चिठ्ठीवर झाली असती. चिठ्ठी कोणाच्याही बाजूने जाऊ शकली असती. आता पुढील सभेपर्यंत भाजप समर्थक पॅनेल येनकेन प्रकारे एका संचालकाला आपल्याकडे घेण्याचे शर्थीचे प्रयत्न करणार हे नक्की.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT