
Satara Collector : महाबळेश्वर तहसीलदारांनी जप्त केलेली कोट्यावधी रुपयांची 'पारशी जिमखाना ट्रस्ट' ची जागा जिमखान्याला परत करण्याचे आदेश साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिला आहे. पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणातील आरोपी सुरेंद्र, विशाल आणि शिवानी अगरवाल हे या ट्रस्टवर आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जातो.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाबळेश्वर शहरातील शासकीय मिळकत पारशी जिमखाना ट्रस्टला भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. पण मूळ प्रयोजनाव्यतिरिक्त या जागेवर अवैधरित्या हॉटेल आणि लॉजिंग व्यवसाय सुरु केला. गतवर्षी मे महिन्यामध्ये पुण्यातील पोर्श अपघात प्रकरणानंतर स्थानिक नागरिकांनी अगरवाल कुटुंबियांच्या या अवैध उद्योगाबाबतही तहसीलदारांकडे तक्रार दिली.
स्थानिकांच्या तक्रारीच्या आधारे तपासणी केली असता जिमखान्याच्या जागेचा वापर हॉटेलसाठी सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर 1 जून 2024 रोजी तहसीलदारांनी जागा जप्त केली होती. या आदेशाविरोधात काही दिवसांपूर्वी ट्रस्टच्या विश्वस्तांनी जागा पुन्हा ताब्यात मिळण्यासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे अर्ज केला होता.
या अर्जावर जिल्हाधिकारी पाटील यांनी सुनावणी घेतली. जागा ताब्यात घेतेवेळी म्हणणे मांडण्याची संधी दिली नाही व शासनाने एकतर्फी जागा ताब्यात घेतल्याची तक्रार ट्रस्टने केली होती. या सुनावणीत हे म्हणणे ग्राह्य धरून ट्रस्टला म्हणणे मांडण्यास संधी देण्यात आली. सुनावणीअंती जिल्हाधिकारी पाटील यांनी काही अटी आणि शर्तींसह 28 ऑगस्टला पारशी जिमखाना ट्रस्टचा अर्ज अंशतः मंजूर केला.
भाडेपट्टा करारानुसार, मूळ प्रयोजनाव्यतिरिक्त सुरू केलेला हॉटेल-लॉजिंग व्यापार तत्काळ बंद करावा. मिळकतीचा वापर मूळ जिमखाना या कारणासाठीच करावा, अशी प्रमुख अट टाकली. मात्र जागेच्या वापरात बदल करायचे असल्यास काही अंशी सूटही दिली. आवश्यक त्या परवानग्यांसह रीतसर प्रस्ताव सादर करावा. त्यावर नियमांनुसार स्वतंत्र निर्णय घेण्यात येईल, अशी सूट दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.