Arunadevi Pisal-Madan Bhosale-Surabhi Bhosale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Wai Politic's : मदन भोसलेंच्या कन्येची ZP एन्ट्री हुकली, पुतण्याचीही पंचाईत; अरुणादेवी पिसाळांना पुन्हा संधी...

ZP Election 2025 : वाई पंचायत समिती सभापतिपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात अंतर्गत स्पर्धा वाढली असून तिसऱ्या पिढीतील राजकीय वारसांना प्रतीक्षेत राहावे लागणार आहे.

भद्रेश भाटे
  1. वाई पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वासमोर उमेदवार ठरविण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

  2. भुईंज, बावधन, ओझर्डे, शेंदुरजणे यांसारख्या गटांमध्ये महिला आरक्षण आल्याने अनेक मातब्बर नेत्यांच्या आकांक्षा धुळीस मिळाल्या, तर काहींना पुन्हा संधी मिळाली आहे.

  3. आरक्षणामुळे अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांसाठी “कही खुशी कही गम” अशी स्थिती निर्माण झाली असून विविध गटांतून नवे चेहरे पुढे येण्याची शक्यता आहे.

Wai, 13 October : वाई पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाल्याने प्रबळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाची डोकेदुखी वाढली आहे. राजकारणात पदार्पण करू इच्छिणाऱ्या प्रस्थापित घराण्यांच्या तिसऱ्या पिढीला वेटिंगमध्ये राहावे लागणार आहे.

वाई (Wai )पंचायत समितीच्या देशभक्त किसन वीर सभागृहात आज (ता. १३ ऑक्टोबर) उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती गणाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी आरक्षण सोडत प्रक्रिया पार पाडली. त्यांना नायब तहसीलदार वैभव पवार, धनश्री पाटील, भाऊसाहेब जगदाळे, अतुल मर्ढेकर यांनी सहकार्य केले. यावेळी सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यशवंतनगर गट तसेच सभापतिपद आणि अभेपुरी गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला राहिल्याने माजी उपसभापती विक्रांत डोंगरे, राष्ट्रवादीचे अशोक मांढरे आणि आनंद चिरगुटे यांना संधी निर्माण झाली आहे. याशिवाय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष (कै.) नारायणराव पवार यांचे पुतणे, भाजपचे जयवंत पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP SP) माजी उपसभापती अनिल जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप बाबर यांचीही नावे चर्चेत आहेत.

भुईंज जिल्हा परिषद गट नागरिकांचा मागास महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने भाजपचे माजी आमदार मदन भोसले यांच्या कन्या आणि भाजप जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा डॉ. सुरभी भोसले यांना जिल्हा परिषदेत पदार्पण करता येणार नाही. मात्र, भुईंज गण महिला राखीव असल्याने त्यांना पंचायत समितीत जाण्याची संधी आहे. मदन भोसले यांचे पुतणे ईशान गजानन भोसले यांचीही पंचाईत झाली आहे. या गणात राष्ट्रवादीला माजी सभापती मनिषा प्रमोद शिंदे अथवा अन्य सक्षम उमेदवार निवडावा लागणार आहे.

बावधन जिल्हा परिषद गट महिलेसाठी राखीव झाल्याने माजी जिल्हा परिषद अध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अरुणादेवी पिसाळ यांना पुन्हा संधी चालून आली आहे. पंचायत समिती सदस्य भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक ननावरे यांची बढतीची संधी हुकली असून त्यांना पंचायत समितीसाठीही खुल्या जागेवरून लढत द्यावी लागेल. मदनराव पिसाळ यांचे नातू ॲड. विजयसिंह पिसाळ यांना पंचायत समितीचा मार्ग स्वीकारावा लागणार आहे.

ओझर्डे जिल्हा परिषद गट महिलेसाठी राखीव झाल्याने माजी सदस्या संगीता मस्कर यांना पुन्हा संधी आहे. महादेव मस्कर यांनी गेली दहा-पंधरा वर्षे ठेवलेला जनसंपर्क त्यांच्या कामी येणार आहे. यशवंतनगर गण अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने अनेक इच्छुकांचे स्वप्न भंग झाले असून या गणातून रिपब्लिकन पक्षाचे युवा कार्यकर्ते स्वप्निल गायकवाड रिंगणात उतरणार हे निश्चित आहे.

सर्वसाधारण अभेपुरी गणातून विक्रांत डोंगरे, राष्ट्रवादीचे अशोक मांढरे व आनंद चिरगुटे यांच्यासह संतोष अंबावले, चंद्रकांत शेलार, रामचंद्र सणस, बापूसाहेब शिंदे, दिलीप वाडकर, चंद्रकांत सणस यांनीही तयारी केली आहे.

शेंदुरजणे गण खुल्या महिलेसाठी राखीव झाल्याने बाजार समितीचे सभापती मोहन जाधव, संचालक केशव गाढवे, युवा नेते विराज शिंदे यांचा अपेक्षाभंग झाला आहे. महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा मनीषा गाढवे तसेच काँग्रेसच्या ऋतुजा शिंदे यांना पुन्हा संधी निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या केंजळ गण नागरिकांच्या मागास वर्गासाठी राखीव झाल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी उपसभापती अनिल जगताप यांचा पत्ता कट झाला असला तरी खुल्या असलेल्या सभापती पदासाठी रिंगणात असू शकतात. ओझर्डे गण नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिला राखीव झाल्याने याठिकाणी सक्षम उमेदवार शोधावे लागतील, असे चित्र आहे. एकूणच गट व गणाच्या आरक्षणामुळे आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह इच्छुकांसाठी ‘कही खुशी कही गम’ अशी स्थिती झाली आहे.

प्रश्न 1 : वाई पंचायत समितीचे सभापतिपद कोणत्या प्रवर्गासाठी खुले झाले आहे?
सर्वसाधारण प्रवर्गासाठी.

प्रश्न 2 : कोणत्या गटात डॉ. सुरभी भोसले यांना संधी मिळू शकते?
भुईंज गट महिलांसाठी राखीव असल्याने त्यांना पंचायत समितीत संधी मिळू शकते.

प्रश्न 3 : माजी अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ यांना पुन्हा संधी कुठे मिळाली आहे?
बावधन जिल्हा परिषद गट महिलांसाठी राखीव झाल्याने.

प्रश्न 4 : आरक्षणाचा एकूण परिणाम काय झाला आहे?
काहींना नवीन संधी तर अनेकांना निराशा — अशी “कही खुशी कही गम”ची स्थिती निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT