Madha Lok Sabha Election 2024 Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024: काय सांगता? माढा निवडणुकीच्या रिंगणात 'यमराज'; चक्क रेड्यावरून येऊन अर्ज भरला!

सरकारनामा ब्यूरो

Madha Lok sabha Election 2024: राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीय नेत्यांनी आपापल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी स्वत:ला झोकून दिलं आहे, तर सध्या अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राजकीय पक्षांकडून शक्तिप्रदर्शन केल्याचं पाहायला मिळत आहे.

उमेदवारी अर्ज भरताना पक्षातील मोठ मोठे नेते स्वत: उपस्थित राहत आहेत. शिवाय मोठ्या प्रमाणात उमेदवाराच्या समर्थकांकडून गर्दी केली जात आहे. जेवढी जास्त गर्दी तेवढा विजयाचा विश्वास जास्त असं समीकरणं मानलं जातं. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरताना पक्षांकडून गर्दी करण्याचा प्रयत्न केला जातो.

अनेकदा उमेदवार अर्ज भरायला जाताना काहीतरी भन्नाट आयडिया शोधतात. यामध्ये कधी कोणी बैलगाडीतून अर्ज भरायला जातं, तर कोणी प्रसिद्ध अभिनेत्याला अर्ज भरण्याच्या रॅलीमध्ये सहभागी करतं. अनेकदा शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य मतदारांना आकर्षित करण्यासाठी शेतकऱ्यांची वेशभूषा करून अर्ज भरायला जातात. तसेच काही उमेदवार पैशांची चिल्लर घेऊन निवडणूक अधिकाऱ्यांकडे (Election Officers) आपला अर्ज भरण्यासाठी जातात. हे सर्व करण्याचा हेतू म्हणजे आपल्या उमेदवारीची चर्चा मोठ्या प्रमाणात व्हावी एवढाच असतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सध्या अशाच एका उमेदवाराची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याचं कारण म्हणजे या उमेदवाराने आपला अर्ज भरण्यासाठी चक्क रेड्यावर बसून आणि यमराजाचा पेहराव करून गेला आहे. या उमेदवाराचा पेहराव पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. रेड्यावर बसून अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेल्या उमेदवाराचं नाव राम गायकवाड (Ram Gaikwad) असं आहे.

राम गायकवाड यांनी माढा (Madha) लोकसभा मतदारसंघासाठी (Lok Sabha Constituency) आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. गायकवाड हे अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाताना रेड्यावर बसून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झाले. आश्चर्याची बाब म्हणजे या वेळी त्यांनी यमाचा पोशाख परिधान केला होता. राम गायकवाड हे मूळचे पंढरपूरचे (Pandharpur) आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून टिकणारे आरक्षण (Maratha Reservation) मिळावे हा मुद्दा घेऊन राम गायकवाड निवडणूक लढवणार आहेत.

Lok Sabha Election 2024

राम गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अनोख्या पद्धतीने एन्ट्री करताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. या वेळी गायकवाड यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचंही पाहायला मिळालं, तर या वेळी 'देशात बोकाळलेला भ्रष्टाचार संपवण्यासाठी साक्षात यमराजांना यावं लागेल लोकसभेत,' असं लिहिलेलं पोस्टर्सदेखील समर्थकांच्या हातात पाहायला मिळाले. त्यामुळे सध्या रेड्यावरून अर्ज भरायला आलेल्या या उमेदवाराची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT