Dhairyasheel Mohite Patil-Ranjitshinh Naik Nimbalkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Victory Bet : कायद्याच्या धाकाने 11 बुलेटच्या पैजेचा विडा 'रंगला'च नाही; माढ्याच्या पाटलांची माघार, फलटणचे शहा ठाम

Vijaykumar Dudhale

Solapur, 25 May : माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयाचा दावा करत चक्क 11 बुलेटची पैज लावणारे माढा तालुक्यातील पाटील बंधूंनी कायद्याच्या धाकामुळे पैजेतून माघार घेतली आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे फलटणमधील समर्थक अनुप शहा यांनी मात्र गुन्हा दाखल झाला तरी बेहत्तर म्हणत 11 बुलेटची पैज कायम ठेवली आहे.

राज्यात माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक या वेळी सर्वाधिक चर्चेची ठरली. भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांच्यात तुल्यबळ लढत झाली. दोन्ही गटाकडून विजयाचा दावा केला जात आहे. त्यातही समर्थकांकडून विजयाच्या पैजा लावल्या जात आहेत. माढ्यातून (Madha Loksabha Constituency) राष्ट्रवादी काँग्रेसचे धैर्यशील मोहिते पाटील निवडून येतील, असे सांगून त्यासाठी माढा तालुक्यातील बावी येथील नीलेश पाटील आणि योगेश पाटील यांनी तब्बल 11 बुलेटची पैज जाहीर केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माढा तालुक्यातील पाटील बंधूंच्या शर्यतीचा विडा खासदार निंबाळकर यांचे फलटणमधील समर्थक अनुप शहा यांनी उचलला होता. त्यावरून दोन्ही बाजूने एकमेकांना खुले आव्हान देण्यात आले. पाटील बंधूंनी मोहिते पाटील यांच्या विजयाचा दावा करत कुर्डूवाडी येथील शोरूममध्ये बुकिंगही केले होते. दुसरीकडे निंबाळकर समर्थक शहा यांनी पंढरपूरमध्ये बुकिंगची रक्कम भरली होती.

पैजेसंदर्भात नोटरी करण्यासाठी गेलेल्या वकिलाने त्यांना कायदेशीर झाला. तसेच, कायद्याचे होणारे उल्लंघन आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या कायदेशीर कारवाईबाबत संबंधितांना समज दिली. त्यानंतर बावी येथील पाटील बंधूंनी 11 बुलेटच्या पैजेतून माघार घेत असल्याचे स्पष्ट केले.

निंबाळकर यांचे समर्थक अनुप शहा यांनी मात्र गुन्हा दाखल झाला तरी चालेल. मात्र, आम्ही निंबाळकरांच्या विजयावर 11 बुलेटची पैज कायम ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर हेच निवडून येणार आहेत. पाटील बंधू यांनी लावलेल्या शर्यतीसाठी मी अजूनही तयार आहे. पैज लावणाऱ्यांना कायद्याची भीती वाटत असेल तर त्यांनी पैजे लावायला नको होती. आमच्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल. मी त्या पैजेतून माघार घेणार नाही, असेही शहा यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT