Madhav Bhandari
Madhav Bhandari Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

माधव भंडारी म्हणाले, नथुराम गोडसे याने केलेल्या कृत्याचे भाजपने कधीही समर्थन केले नाही...

सतीश वैजापूरकर

शिर्डी ( जि. अहमदनगर ) - महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने ( ED ) अटक केली आहे. यावरून महाविकास आघाडी व भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. महाविकास आघाडीकडून या कारवाई विरोधात राज्यभर धरणे आंदोलने होत आहेत. तर भाजपकडून नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. काँग्रेसकडून नथुराम गोडसेच्या मुद्द्यावर भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतो. यावरून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी ( Madhav Bhandari ) यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. ( Madhav Bhandari said, BJP has never supported the action taken by Nathuram Godse ... )

सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुढील वर्षभरात कुठले मुद्दे महत्वाचे असतील हे लक्षात घेऊन भाजपने आपल्या सुमारे 50 प्रवक्त्यांसाठी दोन दिवसांचा अभ्यासवर्ग शिर्डी येथे आयोजित केला आहे. काल ( शनिवारी ) आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री राम शिंदे, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्या उपस्थितीत या अभ्यासवर्गास प्रारंभ झाला.

माधव भंडारी म्हणाले, नथुराम गोडसे याने केलेल्या कृत्याचे भाजपने कधीही समर्थन केले नाही. मात्र, काँग्रेस व डाव्या पक्षांनी याबाबत सतत अप्रचार केला. त्याचबरोबर एक वर्ग नथुरामचे उदात्तीकरण करू पहातोय ते देखील भाजपला मान्य नाही. असे उदात्तीकरण हे हिंदूत्वाचे स्वरूप असूच शकत नाही. या अभ्यासवर्गात आपण हाच विषय मांडणार आहोत, असे माधव भंडारी यांनी सांगितले.

भाजपच्या बारा आमदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून यापूर्वीच राज्यात घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. आता अटकेत असलेले मंत्री नबाब मलिक यांचा राजीनामा न घेतल्यास असाच आणखी एक पेच निर्माण होऊ शकतो.

ते पुढे म्हणाले की, आम्ही वर्षातून दोन वेळा प्रवक्ते व विविध वाहिन्यांवर पक्षाची भूमिका मांडणारे माध्यम प्रवक्ते यांचे अभ्यासवर्ग घेतो. सध्या राज्यातील राजकीय परीस्थिती काहीशी वेगळी आहे. हिंदू आणि हिंदूत्व, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अर्थिक आघाडीवरील कामगिरी, अर्थसंकल्प, सहकार आणि कृषी याबाबत या अभ्यासवर्गात त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल. हे मुद्दे पुढील वर्षाकरीता महत्वाचे असतील असे आम्हाला वाटते.

मुंबई महापालिकेबाबतची रणनीती अर्थातच ठरविली आहे. मात्र, त्याचा आणि या अभ्यासवर्गाचा संबंध नाही. मुंबईसाठी आम्ही वेगळी रचना केलीय. त्यासाठी स्वतंत्र अभ्यासवर्ग आयोजित केला जाईल, असेही भंडारी यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT