Kolhapur, 05 November : कोल्हापूरच्या राजकारणात सोमवारी (ता. ०४ नोव्हेंबर) मोठे राजकीय नाट्य रंगले. त्या नाट्यातून माजी मंत्री सतेज पाटील यांच्या चढत्या राजकीय आलेखाला ‘खो’ बसतानाच छत्रपती घराणे आणि सतेज पाटील यांच्यात पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. मधुरिमाराजे यांनी अचानक माघार घेण्याला 2009 च्या विधानसभा निवडणुकीतील मालोजीराजेंच्या पराभवाची किनार असल्याचे मानले जात आहे. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने माघार घेतल्यामुळे सतेज पाटील बॅकफूटला गेल्याचे मानले जात आहे.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी अनेकजण इच्छुक होते, त्यातून माजी नगरसेवक राजेश लाटकर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय माजी मंत्री सतेज पाटील यांनी घेतला होता. काँग्रेसकडूनही लाटकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, लाटकरांच्या उमेदवारीला काँग्रेसमधूनच विरोध झाला. काँग्रेसच्या अनेक नगरसेवकांनी आपण लाटकर यांचा प्रचार करणार नसल्याची भूमिका मांडली.
काँग्रेस नगरसेवकांच्या भूमिकेमुळे कोल्हापूर उत्तरच्या उमेदवाराचा पेच काँग्रेस आणि सतेज पाटील (Satej Patil) यांच्यापुढे निर्माण झाला. काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष सोडविण्याच्या उद्देशाने राजघराण्यातील मधुरिमाराजे छत्रपती यांच्या उमेदवारीचा पर्याय पुढे आला.
लाटकर यांची उमेदवारी रद्द करून त्या ठिकाणी मधुरिमाराजे छत्रपती यांची उमेदवारी काँग्रेसकडून पुन्हा जाहीर करण्यात आली. मात्र, राजेश लाटकर यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. इथपर्यंत सर्व सुरळीत होते मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दोन दिवस आधीच राजकीय नाट्याला सुरुवात झाली आणि सोमवारी त्याचा भडका उडाला.
राजेश लाटकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी खुद्द शाहू महाराज छत्रपती, मालोजीराजे आणि मधुरिमाराजे छत्रपती हे लाटकर यांच्या घरी गेले होते. त्यांनी लाटकर यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली. शाहू महाराज यांच्यानंतर सतेज पाटलांनाही लाटकर यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी फोन केला. मात्र, ते फोन फोनवर उपलब्ध न झाल्याने लाटकरांच्या वडिलांकडे निरोप देऊन सतजे पाटील हे नियोजित कार्यक्रमाला गेले होते.
इकडे राजेश लाटकर यांचा उमेदवारी अर्ज कायम राहणार, हे लक्षात आल्याने छत्रपती शाहू महाराजांनी मधुरिमाराजे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार खासदार शाहू महाराज, मालोजीराजे आणि मधुरिमाराजे छत्रपती यांनी निवडणूक कार्यालयात येऊन अर्ज मागे घेतला. हा सर्व प्रकार सतेज पाटील यांच्यासमोरच घडला.
काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने माघार घेतल्याने संतापलेल्या सतेज पाटील यांनी शाहू महाराजांच्या कार्यकर्त्यांना उद्देशून ‘दम नव्हता तर कशाला रिंगणात उतरायचे? लढायचे नव्हते; तर उमेदवारी घ्यायची नव्हती,’ अशी भाषा वापरली.
मधुरिमाराजे यांच्या माघारीमुळे सतेज पाटील आणि शाहू महाराज यांच्यात प्रथमच वादाची ठिणगी पडली. या वादामुळे बंटी पाटलांच्या चढत्या राजकीय आलेखाला खो बसल्याचे मानले जात आहे. पाटील आणि छत्रपती घराण्यातील वादाला 2009 मधील निवडणुकीची किनार असल्याचे मानले जात आहे.
कारण, कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून 2009 मध्ये मालोजीराजे छत्रपती यांनी निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत मालोजीराजेंचा पराभव झाला होता. त्या पराभवाला सतेज पाटील कारणीभूत आहेत, असे आरोप छत्रपती घराण्याकडून झाले होते.
मात्र, 2019 मध्ये कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसला उमेदवार मिळत नव्हता, त्यावेळी मालोजीराजे यांनी उमेदवारी करावी, यासाठी सतेज पाटील प्रयत्नशील होते. मात्र, छत्रपती घराण्याकडून त्याला नकार आल्यामुळे (स्व.) चंद्रकांत जाधव यांना उमेदवारी देण्याचा निर्णय बंटी पाटलांनी घेतला होता. त्यामुळे छत्रपती घराणे आणि सतेज पाटील यांच्यात 2009 पासून छुपा संघर्ष सुरू होता, त्यातूनच मधुरिमाराजे छत्रपती यांनी माघार घेतल्याचे बोलले जात आहे.
Edited By : Vijay Dudhale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.