satej Patil Vs Mahadeorav Mahadik  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics: राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत महाडिक पुन्हा गुलाल उधळणार की सतेज पाटील सत्ता खेचून आणणार? आज निकाल

Chhatrapati Rajaram Sugar Factory Election Result: या निवडणुकीसाठी विरोधी नेते सतेज पाटील आणि सत्ताधारी महाडिक गटाकडून सर्वस्व पणाला लावून मैदानात होते.

सरकारनामा ब्यूरो

Kolhapur Election News: कोल्हापूरच्या राजकारणात कायमच केंद्रस्थानी राहिलेल्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी आज ता. २५) सकाळी ८ पासून सुरू झाली आहे. या निवडणुकीतील विजयासाठी सत्ताधारी महाडिकांनी कंबर कसली आहे. तसेच काँग्रेसच्या सतेज पाटलांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करत महाडिकांसमोर तगडं आव्हान उभं केलं आहे. आता काही तासांमध्ये महादेवराव महाडिक यांची सत्ता कायम राहतेय की सतेज पाटील विजयाचा गुलाल उधळतात हे स्पष्ट होणार आहे. राजाराम साखर कारखान्याच्या निकालाकडे जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.

छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना(Chhatrapati Rajaram Sugar Factory Election Result) निवडणुकीची मतमोजणी कोल्हापूरमधील रमणमळा येथील शासकीय गोदामात दोन टप्प्यात मतमोजणी होणार आहे. पहिल्या फेरीत १ ते २९ मतदान केंद्र व दुसऱ्या फेरीत ३० ते ५८ केंद्रांवरील मतमोजणी होणार आहे. त्यामुळे निकाल जाहीर होण्यास उशीर लागण्याची शक्यता आहे. एकूण २९ टेबलांवर ही मतमोजणी होत आहे. प्रत्येक टेबलावर ४ अधिकारी आणि कर्मचारी असे एकूण १५० कर्मचारी मतमोजणीसाठी उपलब्ध असणार आहे.

मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल बंदी

निवडणूक अधिकारी निलकंठ करे म्हणाले, छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत असणारे अधिकारी व कर्मचारी, उमदेवार, उमेदवारांचे प्रतिनिधी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेल्या व्यक्ती व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. आयकार्ड असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. निवडणूक रिंगणातील उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल बंदी आहे.

१५० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त

प्रत्येक टेबलावर ४ अधिकारी आणि कर्मचारी असे एकूण १५० कर्मचारी मतमोजणीसाठी उपलब्ध असणार आहे. प्रत्येक टेबलावर सर्व गटांच्या पत्रिकांचे गटनिहाय अलगीकरण केले जाईल. त्यानंतर एक-एक गटाची मतमोजणी होईल. सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या संस्था गटाची मतमोजणी दुपारनंतर सुरू होईल असेही करे यावेळी म्हणाले.

दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी १५० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. रात्रीपासूनच हा बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीचा शेवट कसा असणार, हे उद्या मतपेट्या उघडल्यानंतरच समजणार आहे.

कुणाला झटका, कुणाला दिलासा ?

छत्रपती राजाराम कारखान्यासाठी अत्यंत चुरशीने प्रचार झाला होता. त्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून राजकीय धुळवडीत अनेक आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाल्या. त्यामुळे त्याचे प्रतिबिंब मतदानातही दिसून आला. कारखान्यासाठी रविवारी अत्यंत चुरशीने 91.12 टक्के मतदान झाले होते.

या निवडणुकीसाठी विरोधी सतेज पाटील आणि सत्ताधारी महाडिक गटाकडून सर्वस्व पणाला लावून मैदानात होते. कारखान्यासाठी मतदानाचा वाढलेला टक्का कोणाला झटका आणि कोणाला दिलासा देणार? याचीही उत्सुकता आहे. राजाराम कारखान्याची मागील निवडणूक 2015 मध्ये पार पडली होती. त्यावेळी 90 टक्के मतदान झाले होते. सत्ताधारी पॅनेलने सर्व जागा जिंकल्या होत्या.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT