Mahajyoti Scholarship Exam sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Scholarship Exam : आणखी एका परीक्षेचा बोजवारा; पुण्यात महाज्योतीची परीक्षा रद्द : केंद्रावर विद्यार्थ्यीनींचा संताप

Mahajyoti Scholarship Exam Cancelled in Pune : पुण्यातील महाज्योतीच्या शिष्यवृत्ती परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रावर तांत्रिक गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे.

Aslam Shanedivan

Pune Mahajyoti Exam News : राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विरोधात संतापाची लाट उसळली असून, पुण्यासह राज्यभर आंदोलने केली जात आहेत. MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. एकीकडे या मागणीवरून राज्यातील राजकीय वातावरणही तापलेले असतानाच आता आणखी एक परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या परीक्षेवेळी देखील विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरातील एका परीक्षा केंद्रावर महाज्योती (महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था) ची परीक्षा घेण्यात येणार होती. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने सकाळी ९ ते ११ या वेळेत घेतली जाणार होती. यासाठी शेकडो विद्यार्थीनी केंद्रावर दाखल झाले होते. पण ही परीक्षा सुरू होण्याची वेळ झाली, तरी प्रत्यक्ष परीक्षा सुरू झाली नाही. परीक्षा केंद्रावर आवश्यक संगणक उपलब्ध नव्हते. यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेत मोठा गोंधळ निर्माण झाला.

जे संगणक उपलब्ध होते, ते बंद पडणे आणि लॉग-इन न होणे अशा गंभीर समस्या उद्भवल्या. काही मोजक्याच विद्यार्थिनींचे सिस्टीम लॉग-इन होत होते. जे लॉग-इन झाले, तेही अवघ्या काही वेळातच आपोआप बंद पडणे किंवा लॉग-आऊट होत होते. या सर्व अडचणींसह तांत्रिक गोंधळामुळे विद्यार्थिनींना वेळेत पेपर सोडवता आला नाही. यामुळे परीक्षार्थी विद्यार्थिनींना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

या प्रकारानंतर संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत तक्रारी केल्या. तर एका विद्यार्थीनीने, ‘ही परीक्षा एमपीएससीकडून घेतली जात आहे. पण या केंद्राची कुव‍त नसताना त्यांनी ती घेतली आहे. संगणक कमी असतानाही जादा विद्यार्थिनी आत बसवल्या,’ असे सांगितले.

‘आता ही परीक्षा कशी घ्यायची, त्यांची जबाबदारी आहे. त्यांनी आता नाही. पण नंतर परीक्षा घ्यावी, आमची परीक्षा घ्यावी. कारण आम्ही गरिबाच्या पोरी आहोत, शिष्यवृत्तीसाठी आलो आहोत,’ अशी भावना एका विद्यार्थिनीने व्यक्त केली.

परीक्षा व्यवस्थापनाच्या या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थिनींचे भवितव्य टांगणीला लागले असून, ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. परीक्षा केंद्रावरील प्रमुखांनी याबाबत संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांशी मात्र कोणताच संवाद साधलेला नसल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे.

दरम्यान विद्यार्थिनींचा संताप वाढल्याचे समोर येताच अखेर ही परीक्षा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सकाळपासून केंद्रावर दाखल झालेल्या अनेक विद्यार्थिनींना परीक्षा न देताच परतावे लागले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT