Sangli News : राज्यात सध्या ‘डीजे’चा मुद्दा चर्चेत आला असून यावरून वाद होताना दिसत आहे. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारंपरिक पद्धतीने आणि कमीत कमी ध्वनिप्रदूषण करून गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन केले आहे. मात्र त्यांच्याच मंत्रिमंडळातील गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विरोधी भूमिका घेतली. कदम यांनी हिंदू सण साजरे करताना कोणताही आवाज बंद होणार नाही, अशी भूमिका मांडली आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांतच दोन मतप्रवाह तयार झाल्याची चर्चा आहे.
कदम यांनी केलेल्या भाष्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावर आता विधान परिषदेचे आमदार आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी यावर जहरी टीका केली आहे. त्यांनी महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री हे इंडियात जन्मले आहेत, पण आम्ही भारताल्या लोकांची मागणी घेऊन पुढे आलो आहोत, असे म्हणत टोला लगावला आहे.
ते डीजेवर बंदी आणावी आणि पारंपारिक वाद्यांचा वापर करावा या मागणीसाठी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी सांगलीतील मारूती चौकात भाजपचे युवा नेते पृथ्वीराज पवार यांच्या माध्यमातून पारंपारिक वाद्यांचा खेळ देखील घेण्यात आला.
यावेळी सदाभाऊ खोत यांनी, ग्रामीण भागातील सण हे पारंपारिक असून सर्व सामान्य गाव गाड्यातला शेतकरी सर्वसामान्य माणूस हा पारंपारिक वाद्य वाजवून तो खऱ्या अर्थाने साजरा करत होता. पण अलिकडे काही धनदांडगे हे या उत्सवात घुसले, काही वर्गण्या काढून पारंपारिक वाद्याला फाटा देऊन ‘डीजे’ संस्कृती आणली. याच डीजेच्या तालावर आज अश्लील हावभाव होत असून देवांच्या समोरच लोक नाचत आहेत.
यामुळेच येथे विरोध होत असून पारंपारिक वाद्य आणि पारंपारिक असणारे कलाकार यांना या राज्यात आश्रय मिळायला हवा, असे मत त्यांनी मांडले आहे. राज्यात फक्त डीजेवर बंदी घातली जाऊ नये तर डीजेच तुरूंगात टाकला पाहिजे. ते साहित्य जप्त केलं पाहिजे. कारण या डीजेमुळेच अनेकांचे कान फाटले असून हृदय फाटली आहेत. कोल आजारी पडत आहेत. तर जे आजारी आहेत त्यांनी डीजे लावल्यानंतर गावाच्या बाहेर न्यावं लागत असल्याचेही खोत म्हणाले.
याचवेळी त्यांनी, कदम यांनी राज्यात डीजेला परवानगी देणार, या केलेल्या विधानावरून सदाभाऊ खोत यांनी जोरदार टीका करताना, महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री हे इंडियात जन्मले आहेत, असे म्हटलं आहे. आम्ही भारताल्या लोकांची मागणी घेऊन पुढे आलो आहोत. भारतीय लोककलेला राजाशय मिळाला पाहिजे अशी आमचीभावना आणि मागणी आहे. पण एखादा मंत्रीच ग्रामीण भागातल्या कलेला कमी लेखत असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.