Raju Shetty Protest Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raju Shetty Protest : ऊसदरावरून 'स्वाभिमानी' आक्रमक; पुणे-बंगळुरू महामार्ग रोखला

Rahul Gadkar

Kolhapur News : कारखानदारांना वठणीवर आणण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखला. तब्बल तीन तास हा मार्ग रोखून धरला आहे. कारखानदारांनी मागील हंगामातील १०० रुपये तत्काळ जाहीर करावेत, अन्यथा महामार्गावरून उठणार नाही, अशी भूमिका स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी घेतली. स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पंचगंगा नदी पुलावर हे आंदोलन सुरू आहे.

पालकमंत्र्यांचा सातत्याने शेट्टींशी संपर्क

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (Swabhimani Shetkari Sanghatana) आंदोलनावर ठाम राहण्याची भूमिका घेतल्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) हे जयसिंगपूर कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर सातत्याने पालकमंत्री हसन मुश्रीफ हे शेट्टी यांच्याशी संपर्क साधत होते. मात्र, आंदोलन न करता तत्काळ यातून मार्ग काढावा, अशी सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ करत होते. गेल्या दीड महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. शेवटी आम्ही तीन पावले मागे येऊनही आपण आमची मागणी मान्य करत नसाल, तर आम्ही आंदोलन रोखू शकत नाही, अशा शब्दांत शेट्टी यांनी सुनावल्याची माहिती मिळाली आहे. जे देणार आहेत त्यांना जाहीर करू द्या, बाकीच्यांचा आम्ही समाचार घेतो, अशा शब्दांत राजू शेट्टी यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना सुनावल्याची माहिती आहे.

आंदोलनापूर्वी शेट्टींचे श्री अंबाबाईला साकडे

आंदोलन सुरू होण्यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी श्री करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. शेतकऱ्यांच्या घामाला दान मिळू दे! बळीराजाच्या झोळीत त्यांची हक्काचे पैसे मिळू दे!. त्यासाठी कारखानदारांना सुबुद्धी दे!, असे साकडे राजू शेट्टी यांनी घातले.

दोन्ही बाजूची वाहतूक बंद, पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरील वाहतूक बंद केली होती. दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद केल्याने जवळपास चार तास वाहतूक विस्कळीत झाली होती. प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी वाहतूक मार्गात बदल केला होता. पुण्याकडून कर्नाटकच्या दिशेने जाणारी वाहतूक शिये येथून-कसबा बावडा-कावळा नाका - उजळाई उड्डाणपूलमार्गे कर्नाटककडे वळविण्यात आली होती, तर कर्नाटकाकडून येणारी वाहतूक लक्ष्मी टेकडी- हुपरी- इचलकरंजी- हातकणंगले- जयसिंगपूर-पेठ नाका अशी वळविण्यात आली आहे.

SCROLL FOR NEXT