Kolhapur Latest News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अल्टिमेटम दिल्यानंतरही कारखानदारांनी मागील हंगामातील पैसे न देण्यावर ठाम भूमिका घेतली आहे. अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटना आज रस्त्यावर उतरून शिरोली येथे महामार्ग रोखण्यावर ठाम आहे.
कोणत्याही परिस्थितीत आता तडजोड नाही, अशीच भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली असताना, पोलीस प्रशासनाने मध्यरात्री स्वाभिमानीच्या शिरोळ आणि जयसिंगपूर मधील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.
शिरोळ पंचायत समिती चे माजी उपसभापती सचिन शिंदे यांना आज पहाटे शिरोळ पोलिसांकडून अटक केली आहे. आजचे चक्का जाम आंदोलन चिरडण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे.
साखर कारखानदार व सरकार हे ऊस उत्पादक शेतकरी विरोधी भूमिका घेत आहेत, अशी भूमिका स्वाभिमानाची आहे. तर मागील हप्ता देणे शक्यच नाही, असे कारखानदारांचे मत आहे. यामुळे आंदोलन थांबवून कारखाने सुरू करावे, मागील देता येणार नाही व पुढचे किती द्यायचे हे सांगता येणार नाही, अशी भूमिका कारखानदारांची आहे.
गेल्या 23 दिवसांपासून हंगाम बंद असल्याने त्यातून तोडगा काढण्यासाठी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक झाली. या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चारशे रुपये आम्ही मागणी करत होतो पण आता शंभर रुपये कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावे, अशी भूमिका घेतली होती. सकाळपर्यंत कारखानदारांनी निर्णय न दिल्याने आज शिरोली येथे राष्ट्रीय महामार्ग रोखणार आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका घेऊन कोल्हापूर पोलीस प्रशासनाने देखील तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिरोळ आणि जयसिंगपूर मधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मध्यरात्रीपासून ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. कोणत्याही परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने 500 पेक्षा अधिक पोलीस, अग्निशमनचे बंब आंदोलन स्थळी तैनात केले आहेत.
मुंबई येथे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी संघटना व कारखानदार प्रतिनिधी यांची गतवर्षीच्या ४०० रूपये दुसरा हप्ता व चालू गळीत हंगामात ३५०० रूपये पहिला हप्ता द्या या मागणीसाठी बैठक पार पडली होती. यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, सहकारी कारखाने 'ना नफा ना तोटा' या तत्वावर चालतात. एफ. आर. पी पेक्षा जादा रक्कम देवू नये, असा कोणताही कायदा नाही.
शासन व कारखानदार यांनी व्यावहारीक पातळीवर तोडगा काढावा. अडचणीच्या काळामध्ये शेतक-यांनी कारखान्यांची मदत केली आहे. यामुळे साखर कारखान्यांनी एक पाऊल पुढे येत, जादा दर सीमाभागातील ऊस शेतक-यांना पुरविण्यासाठी आवाहन करतो.
राज्यातील कारखान्यांचे चेअरमन आमदार, खासदार आहेत. या लोकांनी धोरणात बदल करण्यासाठी केंद्राकडे काय पाठपुरावा केला? सगळ्या गोष्टी शेतक-यांनी केला तर मग आमदार खासदार कशासाठी आहेत, असा सवाल ही शेट्टी यांनी केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.