Kolhapur Political News: गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या कोल्हापूरसह इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीसाठी नगरविकास विभागाने मंगळवारी प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले. यापूर्वी तीनवेळा प्रभाग रचना करण्यात आली होती. आता मात्र चार सदस्य प्रभाग रचना करण्याच्या सूचना दिल्यानंतर प्रशासनाची धावपळ उडाली आहे. नव्या आदेशानुसार दोन्ही महापालिकांतील प्रभाग रचना चार सदस्यीय असणार आहे.
महापालिका पातळीवर उद्यापासूनच याला सुरुवात होईल. दरम्यान, 2022 ची सदस्य संख्या कायम ठेवावी, असे आदेशात म्हटल्याने कोल्हापूर महापालिकेत सदस्यांची संख्या 92 तर प्रभागांची संख्या 23 तर इचलकरंजीत सदस्य संख्या 65 तर प्रभाग संख्या 16 होण्याची शक्यता आहे. या सर्व प्रक्रियेसाठी किमान चार महिन्यांचा कालावधी गृहीत धरल्यास निवडणुकीचा बिगुल पावसाळ्यानंतर पण दिवाळीपूर्वीच वाजणार आहे.
कोल्हापूर महानगरपालिका सभागृहाची मुदत 15 नोव्हेंबर 2020 ला संपली आहे. तेव्हापासून जवळपास पाच वर्षे होऊनही पंचवार्षिक निवडणूक रखडली आहे. इचलकरंजी महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची मुदत संपल्यानंतर प्रशासकराज सुरू आहे. राज्य सरकारकडून आतापर्यंत तीन वेळा प्रभाग रचना करण्याच्या सूचना महानगरपालिका प्रशासनाला मिळाल्या.
सभागृहाची मुदत संपल्यानंतर एक समिती सदस्य, तर 2021 मध्ये ओबीसी आरक्षण वगळून प्रभाग रचना झाली. तर तिसरी प्रभाग रचना जुलै 2023 मध्ये तीन सदस्य समितीची झाली. त्यानंतर पुन्हा एकदा चार समिती सदस्य प्रभाग रचना होणार असल्याने प्रशासनाची धांदल आतापासूनच उडाली आहे.
चार सदस्य प्रभाग रचना झाल्यानंतर प्रभागातील इच्छुकांची संख्या अधिक वाढणार आहे. शिवाय नेत्यांची देखील उमेदवारीवरून कसरत होणार आहे. अपक्ष निवडणूक लढवणाऱ्यांसाठी हा धक्का समजला जातो.
पक्षीय आणि संघटन कौशल्यावरच ही निवडणूक जिंकता येणे शक्य आहे. चार सदस्य प्रभाग रचनेनंतर मतदार वाढले तर विविध आमिष दाखवून देखील मतदार वळवण्यासाठी इच्छुकांपुढे मोठे आव्हान असणार आहे. महाविकास किंवा महायुतीमध्ये दावेदार वाढल्यास बंडखोरीची शक्यता देखील नाकारता येत नाही.
दरम्यान, तीनवेळा प्रभाग रचना झाल्यानंतर इच्छुकांनी तीन समिती सदस्यच प्रभाग रचना ग्राह्य धरून कामाला लागले होते. यापूर्वी एक प्रभाग एक सदस्य असल्याने मतदारसंघातील संपर्क मर्यादित होता. मात्र आता चार प्रभाग आणि चार सदस्य असल्याने इतर सहकाऱ्यांशी असलेला संपर्क आणि त्यांची ताकद यावरच इच्छुकाचे गणित अवलंबून आहे. यापूर्वी तीन प्रभाग तीन सदस्य असल्याने इच्छुकांनी राजकीय बेरीज केली होती. पण आता चार प्रभाग चार सदस्य होणार असल्याने पुन्हा एकदा या इच्छुकांना शून्यातून तयारी करावी लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.