Intense grassroots campaigning for the Maharashtra Municipal Council (Nagar Parishad) elections. Prospective candidates are actively meeting local voters and ward residents to gauge support and assert their suitability for the upcoming local body polls. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Nagar Parishad Election : "मीच हंबीर, मीच खंबीर..." : दिग्गजांना चॅलेंज करून स्वतःचा खुटा बळकट करण्यासाठी नवख्यांची धडपड

Nagar Parishad Election : नगरपरिषद निवडणुकीत यावेळी नवख्या उमेदवारांना संधी मिळणार का, याकडे लक्ष आहे. अनेक माजी नगरसेवक कुटुंबीयांना उमेदवारी देत असून घराणेशाही विरुद्ध नवउमेदवारांची संधीसाठी चुरस रंगणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

Nagar Parishad Election : राज्यात नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, प्रमुख पक्षाच्या नेत्‍यांनी इशारत करण्यापूर्वीच प्रभागनिहाय इच्‍छुकांनी मतदारांकडे चकरा मारण्‍यास सुरुवात केली आहे. मतदारांच्‍या भेटीगाठी घेत इच्‍छुक निवडणूक लढवू इच्‍छिणाऱ्या प्रभागात माझीच कशी सरशी आहे, माझाच कसा जनाधार आहे, मीच कसा याठिकाणाहून उपयुक्‍त आहे, याचे महत्त्‍व पटवून देत आहेत.

मीच हंबीर असल्‍याने याठिकाणच्‍या अधिकृत उमेदवारीसाठी मीच खंबीर असल्‍याचे सांगत इतर इच्‍छुकांपेक्षा स्‍वत:चा खुट्टा अधिक बळकट करण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत. त्‍यांच्‍या प्रयत्‍नांना राज्यातील प्रमुख नेते, स्थानिक आमदार, आघाडीचे नेते कशी साद देणार आणि त्‍यांच्‍या सादेला मतदार कसा प्रतिसाद देणार हे आगामी काळात स्‍पष्‍ट होणार आहे.

नगरपरिषद निवडणुकीसाठी द्विसदस्‍यीय प्रभागांची रचना अंतिम करण्‍यात आली. आरक्षणासह सर्व तांत्रिक प्रक्रिया पार पडल्‍यानंतर निवडणुकीसाठीच्या मतदानाचे वेळापत्रक जाहीर झाले. वेळापत्रक जाहीर होण्‍यापासूनच आरक्षणाचा कानोसा घेत अनेकांनी प्रभाग पिंजून काढण्‍यास सुरुवात केली होती. आरक्षणामुळे अडचण झालेल्‍यांनी इतर प्रभागांतील जनाधाराची चाचपणी करत त्‍यानुसार मोटबांधणी सुरू केली आहे.

अनेकांनी मला द्या, मला नाही दिले तर सौभाग्‍यवतींना द्या, असा हट्ट नेत्‍यांकडे सुरू केल्‍याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पूर्वापार निवडणुकीला सामोरे जाणारे चेहरे, त्‍यांचे कुटुंबीय इच्‍छुक असून, त्‍यांच्‍याकडून देखील ‘अ’ला तरी द्या, नाही तर ‘ब’ला तरी द्या, असा लकडा सुरू केला आहे. दिवाळीच्‍या मुहूर्तावर अनेकांनी प्रभागातील मतदारांची घरे फराळाच्‍या निमित्ताने पिंजून काढली असून, त्‍याद्वारे जनाधार वाढविण्‍याचा त्‍यांचा प्रयत्‍न होता.

प्रत्‍येक प्रभागात एकापेक्षा जास्‍त इच्‍छुक असून, त्‍यातील प्रत्‍येक जण मीच सर्वोत्तम असल्‍याचा दावा करत त्‍याच अनुषंगाने पहिल्‍या टप्‍प्‍यातील प्रचार करत आहेत. इतर इच्‍छुकांपेक्षा माझीच बाजू कशी सरस आहे, इतर इच्‍छुक कसे नीरस आहेत, याचे तोंडी ठोकताळे ते नेत्‍यांसह मतदारांसमोर मांडत आहेत.

नवख्यांना मिळणार संधी?

होणाऱ्या निवडणुकीसाठी यापूर्वीच्या काळात पालिकेत प्रतिनिधित्व केलेल्‍यांचाही समावेश आहे. यापैकी अनेकांना उमेदवारी मिळण्‍याची शंभर टक्के शाश्‍‍वती नसल्‍याने त्‍यांनी मुलगा, पत्‍नी यांना निवडणुकीसाठी समोर आणण्‍यास सुरुवात केली आहे. यामागे त्‍यांचा पालिकेतील राबत्‍यात कोणताही खंड पडू नये, असा हेतू असल्‍याचे स्‍पष्‍ट दिसत आहे. आता नेते घराणेशाही की नवख्‍यांना संधी देणार यावर पालिकांच्‍या सत्तासंघर्षाचे गणित अवलंबून राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT