A political rally showcasing local leaders announcing candidates for upcoming municipal elections. The scene highlights the growing influence of political dynasty in Maharashtra. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maharashtra Politics : कार्यकर्त्यांवर सतरंज्या उचलण्याचीच वेळ, 'स्थानिक'च्या निवडणुकांमध्येही घराणेशाहीलाच पसंती

Maharashtra Municipal Elections : कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय इतिहास लक्षात घेता अनेकांनी नगरसेवक ते मंत्री पदापर्यंत मजल मारली आहे. इतिहासातील राजकारण पाहता अनेक नेत्यांनी कार्यकर्त्यांचे भवितव्य पाहून तर अनेकांनी जड अंतकरणाने कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. त्यातून काही मंत्रीही झाले; पण तो काळ आता इतिहासजमा झाला आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News, 19 Nov : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पायाला भिंगरी बांधलेल्या कार्यकर्त्यांना राजकीय नेत्यांनी पुन्हा एकदा घरचा रस्ता दाखवला आहे. नेत्यांकडून नेहमीच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांसाठीच आहेत असं सांगितले जाते.

मात्र याच नेत्यांनी बदलत्या सोयीस्कर भूमिकेने राजकारणातील शब्द फिरवला आहे. जिल्ह्यातील अनेक नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी आपल्या घरातीलच उमेदवारांना संधी देऊन कार्यकर्त्यांच्या जखमेवर आणखीन मीठ चोळले आहे. परिणामी नगराध्यक्षपदासाठी पुन्हा एकदा घराणेशाही उफाळून आली असून, जिल्ह्यातील १३ पैकी नऊ नगरपालिकांत नेत्यांचे वारसदारच या पदासाठी रिंगणात उतरवण्यात आले आहेत.

इतकेच नव्हे तर आरक्षण पडल्यामुळे अनेकांची घराणेशाहीची संधी हुकली आहे. त्यामुळे मात्र काही ठिकाणी कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न करून सहानुभूती मिळवली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी नेत्यांपुढे नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकीचा पर्याय राहतो.

कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय इतिहास लक्षात घेता अनेकांनी नगर सेवकांपासून ते मंत्री पदापर्यंत मजल मारली आहे. इतिहासातील राजकारण पाहता अनेक नेत्यांनी कार्यकर्त्यांचे भवितव्य पाहून तर अनेकांनी जड अंतकरणाने कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. त्यातून काही मंत्रीही झाले; पण तो काळ आता इतिहासजमा झाला आहे.

पण महत्वकांक्षा आणि राजकीय इच्छा शक्ती म्हणून अनेक कार्यकर्त्यांनी नेत्यांशी केलेली हरकत, आणि नाकापेक्षा मोती जड नको या भूमिकेतून अनेक नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपला वारसदार किंवा घरातीलच व्यक्तीला संधी देण्याचे धोरण ठेवले आहे. त्याचा प्रत्यय नगरपालिकांच्या निवडणुकीत येत आहे.

मी नाही तर माझा मुलगा किंवा बायको याच मानसिकतेतून नगराध्यक्षपदासाठी बहुतांश ठिकाणी नेत्यांच्या वारसदारांना रिंगणात उतरण्यात आले आहे. 'राजकीय विद्यापीठ' अशी ओळख असलेल्या कागल तालुक्यातील दोन्हीही नगरपालिकांत नेत्यांनी आपल्या वारसदारांना नगराध्यक्षपदाच्या रिंगणात उतरले आहे. कागलमधून जिल्हा बँकेचे संचालक व मंत्री हसन मुश्रीफ यांचा उजवा हात समजले जाणारे प्रताप ऊर्फ भय्या माने यांच्या पत्नी सविता यांची उमेदवारी, तर त्यांच्या विरोधात मंडलिक गटाचे माजी नगराध्यक्ष दिवंगत व्ही. ए. घाटगे यांच्या नातसून युगंधरा घाटगे यांची उमेदवारी आहे.

मुरगूडमध्ये दोन माजी नगराध्यक्षांच्या पत्नीच एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. भाजप-शिंदे सेनेच्यावतीने माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्या पत्नी सुहासिनीदेवी, तर त्यांच्या विरोधात माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्या पत्नी तसीनम या राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून रिंगणात आहेत.

जयसिंगपूरमध्ये आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर , शिरोळमध्ये आमदार अशोकराव माने यांच्या स्नुषा सारिका अरविंद माने, आजरा नगरपंचायतीत जिल्हा बँकेचे संचालक अशोक चराटी स्वतः रिंगणात उतरले आहेत. पेठवडगावचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असूनही त्या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी यादव सालपे गट आमनेसामने ठाकले आहेत. यादव गटाकडून माजी नगराध्यक्ष विद्या पोळ, तर सालपे गटाकडून स्वतः प्रविता सालपे रिंगणात उतरल्या आहेत.

हातकणंगले नगरपंचायतीत भाजप नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले यांचे बंधू राजू इंगवले नगराध्यक्षपदाच्या रिंगणात आहेत, त्यांच्या विरोधात माजी सभापती दीपक वाडकर, माजी सरपंच अजित पाटील हे आहेत. नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या चंदगड नगरपंचायतीतही माजी नगराध्यक्षा प्राची काणेकर यांचे पती दयानंद काणेकर विरुद्ध गेल्या निवडणुकीत ज्यांच्या पत्नी पराभूत झाल्या ते सुनील काणेकर रिंगणात उतरले आहेत. मलकापूरमध्ये भाजप नेते प्रवीण प्रभावळकर यांनी पत्नी दया यांना रिंगणात उतरवले आहे.

कुरूंदवाड नगरपालिकेत माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांच्या स्नुषा मनीषा डांगे विरुद्ध माजी नगराध्यक्ष जयराम पाटील यांच्या स्नुषा योगिता विजय पाटील यांच्यात सामना रंगणार आहे. कार्यकर्ता दूरच: दहा नगरपालिकांत नेत्यांचे वारसदार रिंगणात तीन नगरपालिकांत कार्यकर्ता मैदानात गडहिंग्लजचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे.

पण या प्रवर्गातील मूळ जातीपेक्षा 'गेडा जंगम' या जातीतील दोन उमेदवार रिंगणात उतरले आहेत. पन्हाळ्यात जनसुराज्य आघाडीच्या जयश्री पोवार-तोरसे, माजी नगराध्यक्ष रूपाली धडेल यांची उमेदवारी, तर अनुसूचित जातीसाठी नगराध्यक्षपद आरक्षित असलेल्या हुपरी नगरपालिकेत भाजपकडून मंगलराव माळगे, शिवसेना ठाकरे गटाकडून मीना जाधव, तर काँग्रेसकडून श्रीकांत शिराळे यांचे अर्ज आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT