Raju shetti
Raju shetti sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

महाविकास आघाडीने पाठीत खंजीर खुपसला : राजू शेट्टींचा संताप अनावर

निवास चौगले : सरकारनामा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या (Kolhapur District Bank) निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला (Swabhimani Shetkari Sanghtna) एक जागा देण्याचे नेत्यांनी मान्य केले होते, पण आता शिरोळच्या जागेचा मुद्दा पुढे करून संघटनेच्या पाठित खंजीर खुपसण्याचे काम सुरू असून भविष्यात हाच खंजिर त्यांच्या पाठित बसेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी पत्रकार परिषदेत दिला.

श्री. शेट्टी म्हणाले,‘बँकेच्या निवडणुकीत स्वाभिमानीला एक जागा देण्याचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी मान्य केले होते. त्यावेळी विधान परिषदेची निवडणूक सुरू होती. यापुढच्या सर्वच निवडणुका महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र लढवण्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले होते. त्यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह इतरांशी चर्चा करून निर्णय कळवण्याचे आवाहन श्री. पाटील यांना आपण केले होते. तथापि श्री. पाटील यांनी अनुसुचित जाती गटातील जागा काँग्रेसच्या वाट्याला असल्याने हा निर्णय मीच घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. आता नव्याने प्रस्ताव देताना त्यांनी शिरोळ विकास संस्था गटातील जागा बिनविरोध करून माघार घेईल त्याला स्विकृत्तचा पर्याय दिला आहे.’

हा नवा पर्याय आम्हाला मान्य नाही. कारण, या गटात उमेदवार एक शिवसेना पुरस्कृत्त व एक काँग्रेसचा आहे. तालुका गटातील विद्यमान संचालक राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या विरोधात तिथे सर्वपक्षीयांनी मोट बांधली आहे. गणपतराव पाटील हे तिथे विरोधात आहेत, ते काँग्रेसचे आहेत. ही जागा बिनविरोध करून श्री. पाटील स्विकृत्त होतील. याचा अर्थ बँकेच्या निवडणुकीत आमची फसवणूक झाली असून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाठित खंजीर खुपसण्याचे काम केले आहे. आयत्यावेळी आमच्या पाठित खुपसलेला हा खंजीर उलटा फिरवायला वेळ लागणार नाही, असा इशाराही श्री. शेट्टी यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांचे नांव न घेता लगावला. यावेळी संघटनेचे प्रा. जालंदर पाटील उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT