अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत देखील महायुतीमध्ये संशयाचे भूत होते. गोकुळ एकतर्फी एका मंत्री मुश्रीफांकडे गेल्यास त्याचे पडसाद भविष्यात काय होतील, याचा अंदाज लागल्याने ऐनवेळी कोणता गेम करून उम्मेदवार बदलला. याचे उत्तर भविष्यात मिळणार आहे. तत्पूर्वी विरोधात सतेज पाटील असले तरी मंत्री मुश्रीफ यांना भविष्यातील विरोधक समजून सर्व घडामोडी घडल्या का? याचा अंदाज अध्यक्ष निवडीवरून लावता येईल का? असा प्रश्न उपस्थित होतं आहे.
गोकुळ’च्या अध्यक्ष निवडीत गुप्त मतदानामुळे होणारी संभाव्य दगाबाजी माजी आमदार राजेश पाटील यांच्या पथ्यावर पडली. त्यातून ऐनवेळी त्यांना अध्यक्षपदी संधी मिळाली. दुसरीकडे के. पी. पाटील यांचे पुत्र रणजितसिंह यांचा ऐनवेळी पत्ता कट करून भाजप-सेनेतील नेत्यांनी आमदार डॉ. विनय कोरे यांची ढाल पुढे करून मंत्री हसन मुश्रीफ यांनाच शह दिल्याचे बोलले जाते.
‘गोकुळ’च्या शासननियुक्त संचालकांवर सुरू असलेला न्यायालयीन वाद अजून संपलेला नाही. अशा परिस्थितीत त्याला तोंड देण्याची क्षमता फक्त मंत्री मुश्रीफ यांच्याकडेच आहे. त्यामुळे ‘गोकुळ’चे पहिले अध्यक्षपद राष्ट्रवादीलाच देण्याचे महायुतीतील नेत्यांच्या बैठकीत निश्चित झाले. राष्ट्रवादीकडून या पदासाठी माजी आमदार के. पी. पाटील यांचे पुत्र रणजितसिंह, राहुल पी. एन. पाटील व माजी आमदार राजेश पाटील यांची नावे पुढे आली. इच्छुक तिघांत मुश्रीफ यांच्या दृष्टीने रणजितसिंह हे ‘सॉफ्ट कॉर्नर’ होते. राहुल यांच्या निवडीला आमदार चंद्रदीप नरके यांचा संभाव्य विरोध आणि त्यांची पहिलीच ‘टर्म’ हा अडथळा होता. शिवाय मुश्रीफ यांच्यासाठी रणजितसिंह व राहुल हे वनसाईड होते.
नविदच्या जागेवर रणजित अध्यक्ष झाला तर संघावर आपले वर्चस्व राहील हाही त्यामागील हेतू होता. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत रणजितसिंह हेच अध्यक्ष होतील, अशी शक्यता होती. दुसरीकडे के. पी. यांच्या पातळीवरही त्याची जोरदार तयारी झाली होती. कार्यकर्त्यांना बोलवण्यापासून ते दारात मंडप घालून जल्लोषाचेही नियोजन केले होते. पण, या नियोजनालाच भाजप-सेनेतील काहींनी सुरुंग लावला. अध्यक्षपदाचे मतदान गुप्त आहे, त्यात राजेश पाटील यांच्यासह त्यांचे भाचे ॲड. विरेंद्र मंडलिक हे वेगळा निर्णय घेऊ शकतात, अशी हूल उठवली.
प्रत्यक्ष तसे झालेच, तर १५ विरुद्ध १४ मतांनी ‘समविचारी’चा अध्यक्ष होईल, अशी शक्यता वर्तवली. ही बातमी भाजप, सेनेतील प्रमुख नेत्यांनी डॉ. कोरे यांच्यामार्फत भाजपसह राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवली. भुदरगड तालुक्यातून या खेळीवरूनच पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात समाजमाध्यमांवर फिरत असलेल्या एका मेसेजमुळे यात कोण कोण होते, याची माहिती पुढे आली. या सगळ्या घडामोडीत रणजितसिंह पाटील यांचा पत्ता कट करून ऐनवेळी राजेश पाटील यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली.
अध्यक्षपदी राजेश यांची निवड झाल्यानंतर पालकमंत्री आबिटकर यांनी बाळगलेले मौन, निवडीनंतर राजेश यांनी माजी आमदार असूनही ‘जनसुराज्य’चे समित कदम यांचे केलेले चरणस्पर्श यावरून यात कोणी बाजी मारली हे स्पष्ट होते. एकीकडे मंत्री मुश्रीफ हे ‘समविचारी’च्या १२ संचालकांना घरी घालवण्याची भाषा करत असताना सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची अध्यक्ष राजेश यांची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून जाते. भविष्यात रणजितसिंह यांना संधी मिळेल का नाही हे माहीत नाही; पण पहिल्याच अध्यक्ष निवडीत संभाव्य दगाबाजीची शक्यता मात्र राजेश पाटील यांच्या फायद्याची. तर ठरलीच पण त्याचवेळी भाजप-सेनेतील काहींनी यावरून मुश्रीफ यांना मात्र शह दिल्याचे बोलले जाते.
विधानसभेबाबत थेट तक्रार जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी नरसिंगराव पाटील यांच्या निवडीवरून मंत्री मुश्रीफ व दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्यात संघर्ष निर्माण झाला, तर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राजेश पाटील यांच्या विरोधात मानसिंग खोराटे यांना उभे करण्यात कुणाचा पुढाकार होता, याच्या तक्रारी थेट त्यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत झाल्या होत्या. पवार यांनीही कोल्हापुरातील एका भाषणातही त्याचा संदर्भ दिला होता. राजेश यांच्या आजच्या निवडीने या घडामोडीही पुन्हा चर्चेत आल्या.
पहिल्यांदाच चंदगडचा अध्यक्ष गोकुळच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच अध्यक्ष होण्याचा मान चंदगड तालुक्याला मिळाला आहे. शासननियुक्त संचालकांच्या मतावर आज चंदगडचे माजी आमदार राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली. राजेश पाटील हे गोकुळचे १६ वे अध्यक्ष आहेत, तर प्रशासकांचा कालावधीसहीत ते १८ वे अध्यक्ष झाले आहेत. राजेश पाटील हे माजी खासदार संजय मंडलिक यांचे मेहुणे आहेत
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.