Mahesh kothe  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mahesh kothe : अकाली एक्झिटमुळे महेश कोठेंची 'ती' दोन स्वप्ने राहिली अधुरीच....

Solapur Political News : महेश कोठे हे आपल्या मित्रांसह प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी नदीत स्नान करून ते बाहेर आले, थंडीमुळे रक्त गोठले आणि त्यांना हृदयविकाचा तीव्र झटका आला.

Vijaykumar Dudhale

Solapur, 14 January : सोलापूरचे माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते महेश विष्णुपंत कोठे यांचे प्रयागराज येथील कुंभमेळ्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. कोठे यांच्या अकाली एक्झिटमुळे सोलापूरच्या राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली असून सोलापूर आणि राष्ट्रवादी काँग्रेस एका धुरंदर नेत्याला मुकला आहे. महेश कोठे यांच्या अकाली निधनामुळे त्यांची दोन स्वप्न अधुरीच राहिली आहेत.

महेश कोठे (Mahesh Kothe) हे आपल्या मित्रांसह प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी नदीत स्नान करून ते बाहेर आले, थंडीमुळे रक्त गोठले आणि त्यांना हृदयविकाचा तीव्र झटका आला. सोबत असलेल्या मित्रांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

महेश कोठे यांच्या अकाली निधनामुळे सोलापूरच्या (Solapur) राजकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. महेश कोठे यांना राजकारणाचे बाळकडू त्यांचे वडिल विष्णुपंत कोठे यांच्याकडूनच मिळाले. विष्णुपंत कोठे हे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे स्वीय सहायक होते. सोलापूर महापालिकेवर काँग्रेसची सत्ता राखण्यात कोठे परिवार विशेषतः महेश कोठे यांची भूमिका महत्वाची होती. सोलापूरच्या राजकारणात कोठे नावाचा दबदबा कायम होता. तो आजही आहे.

दरम्यान, शिंदे कुटुंबीयांशी एकनिष्ठ राहिलेल्या कोठेंना आमदारकीची संधी मिळत नव्हती, ती मिळविण्यासाठी महेश कोठे हे काँग्रेसची साथ सोडून शिवसेनेत गेले. शिवसेनेत गेल्यानंतर कोठे यांनी पक्षाला महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपद मिळेल, एवढा जनादेश मिळवून दिला होता. शिवसेनेनेही त्यांना २०१४ च्या निवडणुकीत सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. तसेच, पुढील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेने ऐनवेळी उमेदवारी डावलल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती.

सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून अपशय आल्यानंतर महेश कोठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. राष्ट्रवादीतील फुटीनंतर त्यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. नुकतीच झालेली विधानसभा निवडणूक कोठे यांनी तुतारीच्या चिन्हावर लढवली होती. मात्र, त्यातही त्यांना अपयश आले. तत्पूर्वी २००९ च्या निवडणुकीत त्यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांना जोरदार टक्कर दिली होती.

महेश कोठे यांनी चार वेळा विधानसभा निवडणूक लढवूनही त्यांचे आमदारकीचे स्वप्न अधुरीच राहिले. कोठे परिवाराला ही खंत कायम राहणार आहे. आमदारकीबरोबरच सोलापूरमध्ये आयटी कंपनी सुरू करण्याचे महेश कोठे यांचे स्वप्न होते. आयटी कंपनी सुरू करून सोलापुरातील उच्चशिक्षित तरुणांना शहरातच काम मिळवून देण्याचा त्यांचा ध्यास होता.

विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते दोन कंपन्यांचे भूमिपूजनही करण्यात आले हेाते. मात्र, महेशअण्णांच्या निधनामुळे त्यांच्या हयातीत सोलापूरमध्ये आयटी कंपनी सुरू करण्याचे त्यांचे प्रयत्न पूर्ण होऊ शकलेले नाहीत. कोठे यांच्या अकाली एक्झिटमुळे सोलापूर एका जाणकार नेत्याला मुकला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT