Solapur, 25 November : विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांचे गड किल्ले उद्ध्वस्त झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेस आणि शरद पवारांनी पक्ष सोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. अगदी लोकसभा निवडणुकीपर्यंत तो बोलकिल्ला अभेद्य वाटत होता. मात्र, सोलापूर जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे घड्याळ गायब झाले असून सातारा आणि कोल्हापूरमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा एकही उमेदवार निवडून आलेले नाही, त्यामुळे एकेकाळी खंबीर साथ देणारे सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांनी पवारांची साथ सोडल्याचे विधानसभा निकालातून दिसून येत आहे.
मागील 2019 च्या विधानसभ निवडणुकीत एकसंघ राष्ट्रवादीचे (NCP) सोलापुरातून तिघे (एक पाठिंब्यावर अपक्ष विजयी) विजय झाले होते. त्यात मोहोळ : यशवंत माने, माढा : बबनराव शिंदे, करमाळा : संजय शिंदे (राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अपक्ष) यांचा समावेश आहे. कोल्हापुरातून कागलचे हसन मुश्रीफ आणि चंदगडमधून राजेश पाटील निवडून आले होते.
सातारा (Satara) जिल्ह्यातून घड्याळाच्या चिन्हावर तिघे निवडून आले होते. त्यात फलटणमधून दीपक चव्हाण, वाईमधून : मकरंद पाटील, तर कराड उत्तर मतदारसंघातून बाळासाहेब पाटील विजयी झाले आहेत. सांगलीमधील तासगाव येथून सुमन पाटील, इस्लामपूरमधून जयंत पाटील, तर शिराळा मतदारसंघातून मानसिंग नाईक हे विजयी झाले होते.
विद्यमान 2024 च्या निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला सोलापुरात (Solapur) उमेदवारही मिळाले नाहीत. माढ्यात काँग्रेसमधून आलेल्या मीनल साठे यांना उमेदवारी द्यावी लागली, तर बबनराव शिंदे आणि संजय शिंदे यांनी तर पक्षाची उमेदवारी नाकारून अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. एकटे यशवंत माने हे मोहोळमधून घड्याळ्याच्या चिन्हावर लढले. मात्र, त्यांचाही या निवडणुकीत पराभव झाला. म्हणजे सोलापुरातून घड्याळ गायब झाले.
सोलापुरातून घड्याळ गायब झाले असले तरी ती जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने व्यापली आहे. तुतारीच्या चिन्हावर तब्बल चार उमेदवार निवडून आले आहेत. माळशिरस, करमाळा, माढा आणि मोहोळमधून तुतारीचे उमेदवार विजयी झाले आहेत. सांगली जिल्ह्यातून मागील निवडणुकीत घड्याळाचे तिघे निवडून आले होते. मात्र, या वेळी एकच जागा लढवलेल्या सांगलीतून घड्याळ हद्दपार झाले आहे.
कोल्हापूर आणि सातारा हे दोन्ही जिल्हे अनेक वेळा शरद पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. मात्र या निवडणुकीत या दोन्ही जिल्ह्यातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा एकही उमेदवार निवडून येऊ शकलेला नाही. कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दोन ठिकाणी निवडणूक लढवली होती. या दोन्ही ठिकाणी पवारांंच्या उमेदवारांचा पराभव झाला.
सातारा जिल्ह्याने छत्रपती घराण्यातील उदयनराजे भोसले यांना नाकारून शरद पवारांचे नेतृत्व स्वीकारले होते. मागील 2019 च्या निवडणुकीत साताऱ्यात झालेली पवारांची सभा चांगलीच गाजली होती. मात्र, यंदा साताऱ्याच्या जनतेने पवारांना नाकारल्याचे दिसून येत आहे. साताऱ्यात पाच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपले उमेदवार उभे केले होते. मात्र, या सर्वांना निवडून येता आलेले नाही. त्यामुळे पवारांना एकेकाळी डोक्यावर घेणारे सातार आणि कोल्हापूरने पवारांना नाकारले का, असा सवाल उपस्थित होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.