जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत.
राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेतील प्रवेश-निर्गमामुळे स्थानिक समीकरणांवर थेट परिणाम होणार आहे.
अर्ज दाखल करण्याच्या अंतिम टप्प्यात या घडामोडी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
NCP, Congress and Shivsena UBT setbacks News : सध्या राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी घाई सुरू असतानाच मात्र राजकीय समिकरणांच्या जोडण्यांच्याही घडामोडींनी चांगलाच वेग धरला आहे. अशातच कोल्हापूर जिल्ह्यात दोन मातब्बर नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. राधानगरी तालुक्यातील अजितदादांच्या पक्षाचा बडा नेता काँग्रेसच्या वाटेवर असून गोवा आणि कर्नाटकसह तळकोकणाला जोडणारा जिल्ह्यातील शेवटचा तालुक्यात काँग्रेसला तगडा झटका बसला आहे. येथे दौलतचा कारभार अध्यक्ष म्हणून हाकलेला नेता भाजपच्या वाटेवर आहे. या दोन प्रवेशांसह ठाकरेंच्या शिलेदारांच्या शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्याच्या जोडण्यांवर परिणाम होणार आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा एकाच दिवस शिल्लक असताना जिल्ह्यात राजकीय घडामोडींनी चांगलाच वेग आला. जिल्ह्यातील मध्यवर्ती तालुका आणि शेवट्या तालुक्यात राजकीय गणितं झटक्यात फिरली आहेत. राधानगरी तालुक्यात हसन मुश्रीफ यांच्या सोबत असणाऱ्या ए. वाय. पाटील यांनी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेत राष्ट्रवादीला धक्का दिला आहे.
तिकडे गेली अनेक वर्षे काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या सोबत असणारे दौलत साखर कारखान्याचे माजी चेअरमन गोपाळराव पाटील यांनी भाजपसोबत घरोबा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आता आमदार शिवाजीराव पाटील यांच्या पथ्यावर पडणारा असून एक मोठा गट त्यांच्यासोबत जोडला गेला आहे. तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे गडहिंग्लज तालुकाध्यक्ष शिवप्रसाद तेली यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
नुकत्याच झालेल्या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीनंतर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी वेगाने व झपाट्याने निर्णय घेतले आहेत. ए.वाय.पाटील आणि राहुल पाटील गटाशी त्यांनी तातडीच्या चर्चा करून हातात हात घालून जाण्याचा मनसुबा केला आहे. याचाच आज एक भाग म्हणून ए. वाय. पाटील यांनी जाहीर घोषणा करून काँग्रेससोबत आहोत, असे स्पष्ट केले, तर तालुक्यातील राहुल पाटील राष्ट्रवादी गटाच्या कार्यकर्त्यांनीही या आघाडी सोबत राहण्याचा निर्णय व्यक्त केला आहे.
काँग्रेसला ताकद
गेल्या दोन वर्षांपासून ए. वाय. पाटील नेमके कोणत्या पक्षात जाणार याबाबत चर्चा रंगली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमधून फारकत घेतल्यानंतर त्यांच्या कधी भाजप कधी शिवसेना प्रवेशाबाबत चर्चेचे वादळ उठले होते. मात्र आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस सोबत जाण्याची घोषणा करून आपल्या प्रवेशाबाबत संकेत दिले आहेत.
अशातच काँग्रेससह दोन्ही राष्ट्रवादी पक्षातून बड्या नेत्यांच्या आऊट गोईंगमुळे चिंतेत आली असतानाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाही जबर धक्का बसला आहे. चंदगड तालुकाप्रमुख लक्ष्मण मनवाडकर आणि अनिल दळवी यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीमध्ये शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. एकीकडे चंदगड, राधानगरी, कागल आणि गडहिंग्लजमध्ये राजकीय समीकरणं बिघडली असतानाच मात्र आजरा तालुक्यातील उत्तूर व पेरणोली या दोन गटांसाठी दोन्ही राष्ट्रवादी व ठाकरेंची शिवसेना एकत्र आली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र
इतर ठिकाणी सध्या वातावरण टाईट झाले असून भुदरगड तालुक्यात सत्ताधारी अजितदादांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस हाथ मिळवणी केली आहे. तर येथे शिंदेंची शिवसेना आणि भाजप एकत्र असतील. माजी आमदार के. पी. पाटलांनी देखील आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे.
गगनबावड्याच्या दोन्ही जिल्हा परिषद आणि चार पंचायत समितीच्या जागा कांग्रेस लढवणार असून, येथे शिंदेसेना आणि भाजप समसमान जागा लढवणार आहे.
हातकणंगले तालुक्यात महायुती आणि महाविकास अशी लढत होण्याची नेत्यांची घोषणा बंडखोरीला निमंत्रण देणारी आहे. शिंदेंची शिवसेना स्वतंत्र अर्ज भरण्यावर ठाम असून कार्यकत्यांच्या निवडणुकीमध्ये नेते आपल्याच मुलाबाळांना उमेदवारी देत असल्याने इच्छुकांची कोंडी झाली आहे.
1) कोल्हापूर जिल्ह्यात सध्या कोणत्या राजकीय घडामोडी सुरू आहेत?
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या नेत्यांचे पक्षांतर सुरू आहे.
2) राष्ट्रवादी काँग्रेसला कुठे धक्का बसला आहे?
राधानगरी तालुक्यातील अजित पवार गटाचा बडा नेता काँग्रेसच्या वाटेवर असल्याने राष्ट्रवादीला धक्का बसला आहे.
3) काँग्रेसला कोणत्या भागात नुकसान झाले आहे?
गोवा-कर्नाटक-तळकोकणाला जोडणाऱ्या शेवटच्या तालुक्यातील नेता भाजपमध्ये जात असल्याने काँग्रेसला फटका बसला आहे.
4) शिवसेनेतील प्रवेशाचा परिणाम काय होईल?
ठाकरे गटातील शिलेदार शिंदे गटात गेल्याने पंचायत समिती आणि जिल्हा परिषद समीकरणे बदलणार आहेत.
5) या सर्व घडामोडींचा निवडणुकांवर कसा परिणाम होईल?
यामुळे युती, आघाडी आणि उमेदवारांच्या गणितांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.