करमाळा (जि. सोलापूर) : करमाळा (Karmala) तालुक्यातील भिलारवाडी येथील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. कारखान्याच्या १७ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. मकाई सहकारी साखर कारखान्यावर स्थापनेपासून बागल गटाची एकहाती सत्ता आहे. बागल गटाचे नेते दिग्विजय बागल हे गेली दोन पंचवार्षिक कारखान्याचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. (Makai Sugar Factory Election Announced)
सध्या मकाई कारखान्यासमोर (Sugar Factory) आर्थिक अडचणी आहेत. चालू हंगामातील गाळप उसाचे पैसे देणे बाकी आहेत. याशिवाय कामगारांचे थकलेले पगार, ऊस वाहतूकदारांची देणे, वाहतूकदारांच्या नावावर काढलेले कर्ज याबाबतीत कारखाना अडचणीत आहे. मागील वर्ष कारखाना सुरू करण्यासाठी कोणत्याही बँकेकडून पैसे उपलब्ध न झाल्याने बागल यांनी स्वतःची प्रॉपर्टी बँकेला तारण देऊन पैसे उपलब्ध करून कारखाना सुरू केला होता.
कारखान्यासमोर असलेल्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल, कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल प्रयत्न करत आहेत. मात्र अद्यापही सर्व देणी देण्यात आली नाहीत. अशा परिस्थितीत ही निवडणूक (Election) जाहीर झाली आहे.
आदिनाथ कारखान्याप्रमाणे मकाई सहकारी साखर कारखान्याची परिस्थिती होऊ नये; म्हणून दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामदास झोळ यांनी मकाई सहकारी साखर कारखाना लढविण्याचे जाहीर केले आहे, त्यासाठी मकाई बचाव समिती काढण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून बागल विरोधकांना एकत्र घेऊन ही निवडणूक लढवण्याचे प्रा. झोळ यांनी यापूर्वी जाहीर केले आहे.
प्रा. झोळ यांच्या भूमिकेला माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी पाठिंबा दिला आहे. या निवडणुकीत आमदार संजय शिंदे, माजी आमदार नारायण पाटील हे काय भूमिका घेणार? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
मागील संचालक मंडळातील काही संचालकांनी मकाई कारखान्याच्या कारभारावर आक्षेप घेत बंडाचा झेंडा उभारला होता. त्यानंतर हे बंड शांत करण्यास बागल गटाच्या नेत्यांना यश आले. बंडाचा झेंडा उभारलेल्या संचालकांपैकी किती संचालकांना पुन्हा संधी मिळणार याविषयी चर्चा रंगली आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी संघटनेने बागल यांच्या विरोधात उमेदवार उभे केले होते. शेतकरी संघटनेच्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे राजकीय पाठबळ नसतानाही त्यांनी चांगली लढत दिली होती. यावेळी मकाई बचाव समितीच्या माध्यमातून बागल विरोधकांना एकत्र करत स्वतंत्र पॅनल उभा करण्याचे नियोजन सुरू आहेत, त्याला कितपत यश येते, हे पाहावे लागणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी पुनर्वसन सोपान टोपे हे कामकाज पाहत आहेत मकाई सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची मुदत संपून एक वर्ष होऊन गेले तरी देखील निवडणूक जाहीर करण्यात आली नव्हती ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.
या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज ता.१२ मे ते १८ मे या कालावधीत भरता येणार आहेत. उमेदवारी अर्जाची छाननी १९ मे रोजी सकाळी अकरापासून करण्यात येणार आहे. उमेदवारांना आपले अर्ज २२ मे ते ५ जून या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी तीनपर्यंत मागे घेता येतील. निवडणूक चिन्हाचे वाटप ६ जूनला करण्यात येणार आहे. मतदान १६ जून होणार असून निकाल १८ जून रोजी घोषित करण्यात येणार आहे.
मकाईचा निवडणूक खर्च भरला; आदिनाथचा का नाही
करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना आणि श्री मकाई सहकारी साखर कारखाना या दोन्हीही साखर कारखान्यावर बागल गटाची सत्ता होती. या दोन्ही सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका होणे अपेक्षित होते. मात्र, निवडणूक खर्च न भरल्याने आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक नेमण्यात आला आहे. मकाई सहकारी साखर कारखाने वेळेत निवडणुकीचा खर्च भरल्याने ही निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. आदिनाथ कारखान्यासाठी निवडणूक खर्च भरला असता तर दोन्हीही कारखान्याच्या निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळाली असती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.