Subhash Deshmukh-Ajit Pawar-Sanjay Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karmala Politics : सुभाषबापूंनी महायुतीत ठिणगी टाकली; संजय शिंदेंच्या करमाळ्यातून भाजपचा आमदार करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन

Vijaykumar Dudhale

Solapur, 08 July : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत सुरू असलेली खडाखडी आता कुठे थांबली असताना सोलापुरातील भाजपचे वरिष्ठ नेते तथा माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी टाकली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष आमदार संजय शिंदे यांच्या करमाळा मतदारसंघात जाऊन कमळाच्या चिन्हावरील आमदार निवडून आणा, असे आवाहन केले. त्यामुळे महायुतीत जागा वाटपावेळी काय होऊ शकते, याची झलकच दाखवून दिली आहे.

करमाळा (Karmala) तालुक्यातील देवळाली येथे भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांनी महायुती (Mahayuti) सरकारने केलेली कामे सांगून सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) दृष्टिकोनातून करमाळ्यातील कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, अशा सूचना केल्या.

महायुतीच्या नेत्यांनी विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतरही सुभाष देशमुख यांनी संजय शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या करमाळ्यात जाऊन कमळाच्या चिन्हावरचा आमदार करण्याचे केलेले आवाहन महत्वपूर्ण ठरते. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून काय उत्तर येते, हे पाहावे लागेल.

मागील विधानसभा निवडणुकीत करमाळ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष म्हणून संजय शिंदे यांनी निवडणूक लढवली होती. शिवसेनेने विद्यमान आमदार असूनही नारायण पाटील यांना डावलून रश्मी बागल यांना तिकीट दिले होते. शिवसेनेकडून डावलण्यात आल्यानंतर नारायण पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती.त्या निवडणुकीत रश्मी बागल या तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या होत्या. नारायण पाटील आणि संजय शिंदे यांच्यामध्ये काट्याचे लढत झाली होती. त्यात राष्ट्रवादी पुरस्कृत संजय शिंदे हे निवडून आले होते

करमाळा मतदारसंघावर भाजपचा डोळा असल्याचे दिसून येत आहे. कारण, करमाळ्याचा आमदार आता भाजपच्या चिन्हावर निवडून आणा, असे आवाहन वरिष्ठ भाजप नेते, माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे, त्यामुळे लोकसभा निकालानंतर उडालेला आरोप-प्रत्यारोपचा धुराळा खाली बसत असतानाच देशमुख यांच्या विधानानंतर महायुतीमध्ये पुन्हा खडाखडी होऊ शकते.

मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून निवडणूक लढवलेल्या रश्मी बागल आणि दिग्विजय बागल यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेला बागलांच्या मकाई कारखान्याला मदत करण्याचा शब्द भाजप प्रवेशावेळी त्यांना देण्यात आला होता. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या चार दिवस अगोदर ही रक्कम भाजपकडून देण्यात आली आहे. त्यामुळे बागलांनी गाळप झालेल्या उसाचे बिल शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दिग्विजय बागल यांनी रश्मी बागल यांना आमदार करण्यासाठी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन केले होते. आता रश्मी बागल निवडणूक लढवणार की दिग्विजय हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. विधानसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढायची वेळ आली तर भाजपकडून उमेदवार तयार असावा, यासाठीही भाजपची खेळी असू शकते. या वर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT