Shivsena morcha on Lonand
Shivsena morcha on Lonand SYSTEM
पश्चिम महाराष्ट्र

स्वच्छ सर्व्हेक्षणात गैरव्यवहार; लोणंद नगरपंचायतीवर शिवसेनेचा मोर्चा

रमेश धायगुडे

लोणंद : लोणंद नगरपंचायतीने राबविलेल्या शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण योजनेत आरोग्य विभागाकडून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असून या गैरव्यवहाराची वरिष्ठ पातळीवरुन चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी. या मागणीसह येथील दोन झोपडपट्टीतील नागरीकांच्या विविध प्रश्नांसाठी आज ( ता. ३१) लोणंद शहर शिवसेनेच्या वतीने लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विश्वासअण्णा शिरतोडे यांच्या नेतृत्वाखाली लोणंद नगरपंचायतीवर मोर्चा काढून नगरपंचायतीच्या ढिसाळ कारभाराचा निषेध नोंदविला.

यावेळी मोर्चात शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रदिप माने, शिवसेनेचे जेष्ठ नेते लक्ष्मणराव जाधव, माजी नगरसेवीका कुसूम शिरतोडे, संजय जाधव,लोणंद शहर शिवसेना अध्यक्ष सुनिल यादव, गणेश पवार, गणेश जाधव, जिल्हा वडार समाज संघटणेचे उपाध्यक्ष नाना जाधव, महमंदशेठ कच्छी महिला व नागरीक मोठया संख्येने सहभागी झाले होते.

शिवसेना नेते विश्वासअण्णा शिरतोडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज सकाळी डोक्यावर हांडे व विविध मागण्यांचे फलक घेवून मोर्चेकरी जूना -फलटण रोड येथे जमा झाले.अहिल्यादेवी होळकर स्मारकातीत अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शासकीय विश्रामधाम येथून या मोर्चास प्रारंभ झाला. विविध घोषणा देत मोर्चा बसस्थानक चौक, शिरवळ चौक, स्टेशन चौक, शास्त्री चौक,नवी पेठ, गांधी चौक, जुनी पेठ, तानाजी चौक मार्गे नगरपंचायत पटांगणावर आला. त्यावेळी तेथे मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.

यावेळी बोलताना विश्वासअण्णा शिरतोडे म्हणाले, ''गेली तीन वर्षे नगरपंचायतीने विकासकामात झोपटपट्टीतील नागरीकांची चेष्ट चालवली आहे.स्वच्छ सर्वेक्षण योजने अंतर्गत सार्वजनिक शौचालयांसाठी आलेला ७० ते ८० लाखाचा निधी विभाग प्रमुखांच्या मदतीने मुख्याधिकारी लटण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबत जिल्हाधिकारी व खंडाळा तहसीलदार यांना निवेदने देवूनही आजवर त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. नगरपंचायत व शासनाच्या या ढिसाळ कारभाराचा आम्ही निषेध करत आहोत.

श्री. शिरतोडे म्हणाले, लोणंद पोलिस ठाण्याशेजारच्या आंबेडकर कॉलनी ( झोपडपट्टी) व सईबाई हौसिंग सोसायटी शेजारच्या झोपडपट्टीत कसल्याच नागरी सुविधा नाहीत, येथील महिला व नागरीकांना शौचालयासाठी रेल्वेलाईनच्या कडेला बसावे लागत आहे. पिण्याचे पाणी नाही. शहरात कचरा उचलण्यासाठी ७ घंटागाडयांचे टेंडर आहे. प्रत्यक्षात ३ ते ४ घंटागाडया कार्यरत आहेत. शहरातील होत असलली विकासकामे दर्जाहिन आहेत.

लोणंदकर नागरीकांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या आवाहनाला प्रतिसात देत राष्ट्रवादीला एकहाती सत्ता दिली. मात्र, चार दिवस उलटले नाहीत, तोपर्यंत सत्ताधारी दहा नगरसेवकांनी ठेकेदारांना ३० टक्के कमिशन असेल तरच कामे घ्या. नाहीतर नगरपंचायतीची पायरी शिवू नका, असे सांगितले. यासाठीच का एकहाती सत्ता दिली.

श्री. शिरतोडे म्हणाले, ''गावातील ते गावातीलच बाहेरच्यांना गावाचा काय विकास कळणार आनंदराव मामा व अॅड. कै. बाळासाहेबांच्या कल्पक नेतृत्वामुळे आजवर शहराचा विकास झाला. मात्र, स्वतःची लायकी नसणारे, गुलाम व लाचार होवून दुसऱ्याच्या पैशावर निवडून आलेल्या नगरसेवकांना नगरपंचायतीत कसलाही अधिकार नाही. त्यांनी राजीनामे द्यावेत.

यावेळी प्रदिप माने, संजय जाधव व सुनिल यांनीही मनोगते व्यक्त केली. गणेश पवार यांनी आभार मानले. यावेळी मोर्चाच्या वतीने नगरपंचायतीचे कार्यालयीन अधिक्षक शंकर शेळके यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.लोणंद पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक गणेश माने व त्यांचे सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT