Shaktipeeth Mahamarg Latest News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shaktipeeth Mahamarg : ‘शक्तिपीठ’बाबत माणगावात गोंधळ? ग्रामपंचायतीच्या एका सभेत विरोध दुसऱ्या सभेत मंजूरी, शेतकरी संतप्त

Mangaon Gram Panchayat Resolution On Shaktipeeth Mahamarg : कोल्हापूर जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्ग जाणार नाही अशी भूमीका तत्कालिन पालकमंत्री तथा विद्यमान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली होती.

Aslam Shanedivan

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तिपीठ महामार्ग जाणार नाही, असे वक्तव्य तत्कालिन पालकमंत्री तथा विद्यमान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं होतं. त्यांनी दाखवलेल्या विरोधामुळेच त्यांची रवानगी वाशिम येथे पालकमंत्री म्हणून करण्यात आली. तर कोल्हापूरचे पालकमंत्रीपद प्रकाश आबिटकर यांच्याकडे देण्यात आले. पण त्यांनी देखील जिल्ह्यातील हा महामार्ग रद्द झाला आहे, असे वक्तव्य काहीच दिवसांपूर्वी त्यांनी केले होते. पण आता हातकणगंले तालुक्यातील माणगांव ग्रामपंचायतमध्ये राज्य शासनाच्या संदिग्ध भूमिकेप्रमाणेच सध्याचे चित्र आहे. ग्रामपंचायतीने एकाच सभेत विरोध दुसऱ्या सभेत महामार्गास मंजूरी दिल्याने वाद निर्माण झाला आहे. तर यावरून गावातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गाला तीव्र विरोध होत असल्यानेच जिल्ह्यातून शक्तिपीठ महामार्ग वगळण्यात आला आहे. पण याबाबत राज्य शासनाची भूमिका संदिग्ध दिसत आहे. अशातच प्रजासत्ताकदिनी ग्रामसभेत ग्रामपंचायत सदस्यांनी शक्तिपीठ महामार्ग व्हावा, अशा ठराव केल्याने गावात एकच तणाव निर्माण झाला आहे. पण याआधीच शक्तिपीठ महामार्ग रद्द बाबत ठराव करण्यात आला होता. आता अशा पद्धतीने ग्रामपंचायतीच्या दुहेरी भूमिकेबाबत शेतकरऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

याआधी गावातील बाधित शेतकऱ्यांनी जून 2024 मध्ये ग्रामपंचायतीची विशेष सभा घेत शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, अशी मागणी केली होती. तसेच अशा आशयाचे निवेदन दिले होते. याप्रसंगी उपसरपंच विद्या जोग व माजी उपसरपंच अख्तर भालदार, सदस्य नितीन कांबळे, मनोज आदाण्णा यांनी निवेदन स्वीकारत शक्तिपीठ महामार्गास माणगांव ग्रामस्थाचा विरोध राहील. तसा ग्रामपंचायत सभेत ठराव करत असल्याचे आश्वासन शेतकरी आंदोलक यांना दिले होते.

मात्र आता 26 रोजी झाालेल्या ग्रामसभेत शक्तिपीठ महामार्ग व्हावा, असा ठराव रेटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामुळे अभिषेक मगदूम, वृषभ पाटील, अंकुश चव्हाण यासह बाधित शेतकऱ्यांनी जोरदार विरोध करत आक्रमक भूमिका घेतली आहे.

शक्तिपीठ महामार्गामुळे माणगावातील 96 एकर बागायत जमीन बाधित होणार असून ४ एकर जमीन नापिक आहे. पण उर्वरित जमीन बागायती व कसदार आहे. शक्तिपीठ महामार्गामुळे बागायत जमिनीचे अस्तित्व संपणार असून यामुळे 450 शेतकरी भूमिहीन होणार आहेत. महामार्ग झााल्यास गावास पुराची भीती असून पूर वेशीलगत येणार आहे. शिवाय महामार्गामुळे जमिनीचे दोन भागांत विभागणी होणार असून हजारो एकर जमीन नापीक होणार आहे. सध्या रूई बंधाऱ्याचा फटका येथील शेतीस आणि शेतकऱ्यांना बसत असून शक्तिपीठ महामार्गामुळे येथील शेतकरी भूमिहीन बनणार आहे.

दरम्यान ग्रामपंचायतीच्या अशा दुघेरी भूमिकेमुळे संतप्त भावना उफाळल्यानंतर माणगावचे सरपंच राजू मगदूम यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तसेच शक्तिपीठ महामार्ग ज्यांना हवा आहे त्यांनी आणि ज्यांना नको आहे त्यांनी आपले अर्ज ग्रामपंचायतीकडे द्यावेत. दोघांचे अर्ज आल्यानंतर ग्रामपंचायत शक्तिपीठ महामार्गाचा निर्णय घेईल, असे म्हटले आहे.

तर यावरून बाधित शेतकरी अभिषेक मगदूम यांनी नाराजी व्यक्त करताना ग्रामपंचायतीच्या दुहेरी भूमिकेचे नेमके रहस्य काय? असा सवाल उपस्थित केला आहे. शक्तिपीठ महामार्गामुळे वडिलोपार्जित जमीन जाणार असल्याने माझ्यासह अनेक बाधित शेतकऱ्यांचा विरोध असल्याचे म्हटलं आहे. तर सहा महिन्यांपूर्वी विरोधाचा ठराव ग्रामपंचायतीने केला होता. पण असे अचानक ग्रामपंचायत घुमजाव का करत आहे? असा देखील सवाल बाधित शेतकरी अभिषेक मगदूम यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT