Satara, 22 October : मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व आरोपांची चौकशी झाली पाहिजे. त्यामागे दृश्य की अदृश्य शक्ती आहे. रिमोट कंट्रोलद्वारे कोणी कोणाला चालवतंय का? यामागील सत्य काय आहे?, हे लोकांना कळलं पाहिजे. एकनाथ शिंदेंसारख्या माणसावर शिंतोडे उडवून त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र या आरोपामागे दिसत आहे, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी केली.
मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर ५०० कोटींचे गंभीर आरोप केले आहेत. त्यासंदर्भात जरांगे यांनी आज एक ऑडिओ क्लिप जाहीर केली आहे. त्यावर उत्तर देताना शंभूराज देसाई यांनी हे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे.
मंत्री देसाई म्हणाले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी मला पाठवलं जायचं. त्यावेळी जरांगे पाटील हे शिंदे यांच्याविषयी चांगलं बोलायचे. शेतकऱ्यांचा मुलगा आहे, मराठा समाजाचं चांगलं त्यांच्याकडून होईल, असे ते म्हणायचं. पण, २०२४ च्या निवडणुकीनंतर किंवा गेल्या सहा महिन्यांपासून असं नेमकं काय घडलं? मनोज जरांगे एकदमच शिंदेंवर टीका करायला लागले.
मराठा समाजाच्या हिताला बाधा आणणारे कुठलंही वक्तव्ये एकनाथ शिंदे यांनी केलेले नाही. आमच्या कुठल्याही नेत्यांकडून तसं विधान झालेले नाही. छत्रपती संभाजीनगरमधील दोन जात प्रमाणपत्राच्या पडताळणीवरून आमच्या दोन सहकाऱ्यांबाबत जरांगे यांना आक्षेप होता. स्थानिक नेत्यांनी काही तरी गडबड केली, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यावर शिंदे यांनी आमच्या नेत्यांनी काही गडबड केली असेल तर त्याला कडक शब्दांत समज देण्यात येईल, असे सांगून तशी कडक समज त्या स्थानिक नेत्यांना दिली होती, असे देसाई यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, त्या स्थानिक नेत्यांचा रोष (काय झालं किंवा नाही, हे अजून बाहेर यायचं) एकनाथ शिंदे यांच्यावर काढणं, बरोबर नाही. आमचं काय चुकलं असेल तर सांगावं. आम्हालाही सर्वांना प्रश्न पडला आहे की, त्यांनी एकदा सांगितलं पाहिजे की, शिंदे यांचं या ठिकाणी चुकलं आहे. आता ते म्हणतील, चुकलं. पण ती वस्तुस्थिती आहे का, हेही पाहिलं पाहिजे. एकनाथ शिंदे कालही मराठा समाजाच्या पाठीशी होते आणि उद्याही राहतील.
मराठा समाजाला १० टक्के आरक्षण एकनाथ शिंदे यांनी दिले आणि ते टिकवलं. त्यामुळे त्यांच्याविषयी कोणी गैरसमज पसरवत असेल तर मराठा समाज सुज्ञ आहे. जरांगे पाटील यांच्याप्रमाणेच आम्हीही मराठा समाजासाठीच लढतोय. त्यामुळे पुरावे असल्याशिवाय शिंदे यांच्यावर कोणी टीका करू नये, असेही देसाई यांनी आवाहन केले.
शंभूराज देसाई म्हणाले, ऑडिओ क्लिप आम्ही पाहिली आहे. ते एक ग्रुप कॉलमधील संभाषण आहे. तो कॉल कोणी केला. कोणी कोणी तो कॉल ज्वाईन केला. त्या क्लिपमध्ये एकनाथ शिंदे आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांचं नाव आलं आहे. पण, त्यात तथ्य आहे, असं मानण्याचं कारण नाही. शिवसेना म्हणून आमची मागणी आहे की, या ५०० कोटी रुपये देण्याच्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. जरांगे पाटलांची जी मागणी आहे, तीच आमचीही मागणी आहे.
एकनाथ शिंदे यांची बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सगळ्या चौकशीला समोरे जाण्याची तयारी आहे. मनोज जरांगे पाटील एकदा एक नाव घेतात, थोड्या वेळानंतर दुसरं नाव घेतात. त्यांचा स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांकवर नसेल त्यांच्याकडील ऑडिओ क्लिप, पुरावे त्यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे द्यावेत. ते चौकशी करतील, असेही त्यांनी आवाहन केले.
ते म्हणाले, आमच्या शिवसेना पक्षाची भूमिका स्वच्छ आहे. जरांगे पाटील यांची भूमिका तथ्यहीन आहे. या आरोपामागे कसलंही तथ्य नाही. हे बेछूट आरोप आहेत. त्यामुळे या आरोपाच्या कसल्याही चौकशीला शिवसेना समोरे जायची तयारी आहे.
...म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हायचे राहणार आहेत का?
असल्या आरोपामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हायचे राहणार आहेत का? आमचा नेता पुन्हा मुख्यमंत्री झाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. आमची संख्या सध्या ६० आहे, ती वाढविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.