Satara Dcc Bank : जयकुमार गोरेंनी आपल्या मित्राला अखेर जिल्हा बॅंकेत बिनविरोध आणलेच; महत्वाच्या क्षणी लावली ताकद

Jaykumar Gore -Ranjitsinh Naik Nimbalkar News : सातारा जिल्हा बँकेच्या २१ पैकी ९ जागा बिनविरोध झाल्या. जयकुमार गोरेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना बिनविरोध निवडून आणले. या निवडीवरून भाजप नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
jaykumar gore-ranjitsinh naik nimbalkar
jaykumar gore-ranjitsinh naik nimbalkarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Satara, 22 October : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी २१ जागांपैकी ९ जागा बिनविरोध झाल्या. सलग १० वर्षांच्या नियमांमुळे अनेक मातब्बरांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली. या बिनविरोधमध्ये आपले राजकीय कसब पणाला लावत अनेकांची पत्ते कापले आहेत, काहींना लॉटरी लागली आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आपले मित्र माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना बॅंकेत तेही बिनविरोध आणले. या निवडीवरून भाजप नेत्यांमध्ये गरमागरमी झाल्याची चर्चा आहे.

सलग १० वर्षे संचालकपदी राहिलेल्या नेत्यांना निवडणूक लढविता येणार नाही, या रिझर्व्ह बॅंकेच्या नियमांमुळे आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यामुळे अनेक दिग्गजांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली. त्यांच्या माघारीमुळे अनेक नवख्यांना जिल्हा बॅंकेती एन्ट्री करण्याची संधी मिळाली आहे.

खासदार उदयनराजे भोसले, माजी अध्यक्ष, खासदार नितीन पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे, प्रदीप विधाते, कांचन साळुंखे या विद्यमान संचालकांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली.

भाजपचे आमदार मनोज घोरपडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह पक्षाच्या सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. या माघारीमुळे नऊ जागा बिनविरोध झाल्या. उर्वरित १२ जागांसाठी येत्या एक नोव्हेंबरला मतदान होणार असून, तीन नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. महायुतीतील घटक पक्षांत जिल्हा बॅंकेतील १० जागांचे वाटप होणार होते. त्यापूर्वी भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक मंत्री शिवेंद्रसिंहराजे भाेसले, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली एका हॉटेलमध्ये झाली, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांची बैठक दुसऱ्या एका हॉटेलमध्ये झाली.

jaykumar gore-ranjitsinh naik nimbalkar
Sangli DCC Bank Election: सांगलीच्या बँक निवडणुकीसाठी थेट मुख्यमंत्र्यांचा फोन, जयंत पाटलांचा खुलासा

त्यानंतर दोन्ही नेत्यांची एकत्रित बैठक झाली. त्यामध्ये भाजपला पाच, राष्ट्रवादी काँग्रेसला तीन आणि शिवसेनेला दोन असे ठरले. त्यानंतर सर्व नेते राष्ट्रवादीचे नेते उदयसिंह पाटील यांच्या निवासस्थानी गेले. तेथे कऱ्हाड सोसायटीच्या बिनविरोधसाठी बैठक झाली. त्यानंतर सर्व नेते दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान जिल्हा बॅंकेतील अर्ज काढून घेण्यासाठी येऊ लागले. यामध्ये खासदार उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार नितीन पाटील, आमदार मनोज घोरपडे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, प्रदीप विधाते, कांचन साळुंखे यांच्यासह काही संचालकांनी अर्ज मागे घेतले.

शशिकांत शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सातही उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. केवळ जावळी सोसायटीतून विठ्ठल गोळे यांचा अर्ज ठेवला आहे.

दरम्यान, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नागरी बॅंका, पतसंस्था मतदारसंघातून उमेदवार अर्ज भरला होता. याच मतदारसंघातून आमदार मनोज घोरपडे, शेखर गोरे आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक अविनाश कदम यांचाही अर्ज होता. यातून माघार कोण घेणार, याची उत्सुकता होती.

शिवेंद्रराजेंचे समर्थक अविनाश कदम यांची उमेदवारी निश्चित होईल, अशी शक्यता होती. याशिवाय आमदार घोरपडे आणि शेखर गोरे यांनीही मोर्चेबांधणी केली होती. उमेदवारी मागे घेण्यासाठी भाजपचे दिग्गज नेते प्रयत्न करत होते. मात्र, माजी खासदार निंबाळकर हे उमेदवारीवर ठाम राहिले. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनीही निंबाळकरांसाठी ताकद लावली. या वेळी भाजपमध्ये नेत्यांमध्ये काहींशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर आमदार घोरपडे, गोरे आणि कदम यांनी माघार घेतली, त्यामुळे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

jaykumar gore-ranjitsinh naik nimbalkar
Karmayogi Sugar Factory : कर्मयोगीच्या निवडणुकीतील पात्र उमेदवारांची यादी जाहीर; कोणत्या गटात किती उमेदवार? पाहा संपूर्ण यादी

रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांची मैत्री आहे. राजकारणात त्यांनी आपली मैत्री जपली आहे. माढा मतदारसंघातून निंबाळकर यांना आगामी निवडणुकीत पुन्हा निवडून आणण्यासाठी गोरे यांनी गेल्या दोन वर्षांपासून जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यापूर्वी जिल्हा बॅंकेतही त्यांनी आपल्या मित्रासाठी ताकद पणाला लावत मैत्री जपली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com