Ahmednagar News : राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेवरील 12 सदस्यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने आता अनेकांना आमदारकीचे डोहाळे लागले आहेत. सध्या राज्यात असलेल्या महायुतीमधील शिंदे यांची शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटातील अनेकांना आपली वर्णी लागावी अशीच अपेक्षा आहे. या दृष्टीने आता तीनही पक्षांनी समन्वय साधून १२ नावांची यादी राज्यपालांना देण्यापूर्वी आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीच्या अनुषंगाने विचार करावा लागणार आहे.
नगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण सहा आमदार २०१९ च्या विधानसभेला निवडून आले होते. यातील नगरमध्ये संग्राम जगताप, पारनेरमधून नीलेश लंके, अकोलेमधून किरण लहामटे आणि कोपरगावमधून आशुतोष काळे हे निवडून आलेले आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार गटासोबत गेले आहेत. तर कर्जत - जामखेडचे आमदार रोहित पवार आणि राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी शरद पवार यांची साथ देणे पसंत केले आहे.
याच पार्श्वभूमीवर आता अजित पवारांच्या सोबत गेलेल्या आमदारांमुळे महायुती सरकार अस्तित्वात आल्याने 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप अशा पेचातील जागांवर पक्षाच्या इच्छुक असलेल्या कुणाला उमेदवारी देऊ शकेल? याबद्दल आता चर्चा सुरू आहे. आणि त्यामुळेच यावर राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा 'उतारा' नेमका कुठे लागू करावा लागेल, यावरही निश्चितपणे भारतीय जनता पक्ष आणि एकूणच महायुतीमध्ये वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असणार, असं बोललं जात आहे.
2019 ला कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार यांनी भाजपचे राम शिंदे यांना पराभूत केले. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते असलेले राम शिंदे यांना त्यामुळे तातडीने भाजपने विधान परिषदेवर पाठवून राजकीय पुनर्वसन केले. आता त्याच पद्धतीने अकोल्यातून माजी आमदार वैभव पिचड, कोपरगाव मधून माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि राहुरी मतदार संघातून माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना विधानपरिषद निमित्त भारतीय जनता पक्ष ताकद देणार का? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
अकोला तालुका हा नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत राहिला आहे आणि त्यामुळे या ठिकाणावरून वैभव पिचड यांच्यासाठी भारतीय जनता पक्ष विधान परिषदेचे दरवाजे खुले करणार का? याबद्दल सध्या तालुका आणि जिल्ह्यात चर्चा आहे. स्वतः वैभव पिचड यासाठी मुंबईत तळ ठोकून असल्याचं बोललं जातयं. त्याचबरोबर राहुरी मतदारसंघातून शिवाजी कर्डिले यांच्यासाठीही मोठे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्यासाठी अजित पवारांसोबत गेलेले नगरचे आमदार आणि शिवाजी कर्डिले यांचे जावई आमदार संग्राम जगताप हे देखील प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे.
कोपरगावमध्ये मात्र वेगळेच राजकीय चित्र असेल का? असे बोलले जात आहे. माजी आमदार स्नेहलता कोल्हे किंवा त्यांचे मुलगे विवेक कोल्हे यांनी अद्याप विधानपरिषदसाठी प्रयत्न केल्याची चर्चा दिसून येत नाही. त्यामुळे गणेश कारखाना निवडणुकीनंतर समोर आलेली एकूणच गणिते, कोल्हे आणि थोरात यांची जवळीक आणि त्याचबरोबर आमादार आशुतोष काळे यांनी अजित पवार गटात जाणं, यामुळे कोल्हे परिवार 2024 विधानसभा निवडणुकीसाठी काही धक्कादायक निर्णय घेणार का? याबद्दलही मोठी चर्चा आणि उत्सुकता आता नगर जिल्ह्यात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.