Maratha Aarakshan  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Aarakshan : नगरमध्ये 36 गावांमध्ये नेत्यांना 'नो एन्ट्री'; सदावर्ते यांचा पुतळा जाळला

Mangesh Mahale

Nagar News : मराठा आरक्षणासाठी नगर जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा वाढत आहे. मराठा समाज आक्रमक झाला असून, नगर जिल्ह्यातील 36 गावांमध्ये राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. तशा प्रकारचे फलक लावून निषेध करण्यात आला आहे.

मराठा आरक्षणावर केंद्र व राज्य सरकार गंभीर नसल्याने आगामी निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा इशारा देण्यात आला आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांचा पुतळादेखील जाळण्यात आला आहे.

मराठा सकल समाज आणि मराठा क्रांती मोर्चा मराठा आरक्षणावरून राज्यात आक्रमक झाला आहे. नगर जिल्ह्यातील 36 गावांमध्ये राजकीय नेते, पदाधिकारी यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. अशा आशयाचे फलकदेखील गावच्या मुख्य चौकात लागले आहेत. हे फलक समाज माध्यमांवरदेखील व्हायरल झाले आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधातदेखील नगर जिल्ह्यात रोष व्यक्त केला जात आहे. सदावर्ते यांच्या वाहनाची तोडफोड झाल्यानंतर त्यांनी जरांगे पाटील यांना अटक करण्याची मागणी केली होती. जरांगेंविरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याचा पडसाद नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात उमटले.

पाथर्डी तालुक्यातील सकल मराठा समाजातर्फे वकील गुणरत्न सदावर्ते यांचा पुतळा जाळण्यात आला. पाथर्डी शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मराठा समाजाने हा पुतळा जाळला. उद्धव माने, आप्पासाहेब बोरुडे, अंकुश चितळे, लाला शेख, देवा पवार यांच्यासह मराठा समाजाच्या तरुणांनी हा पुतळा जाळला.

जरांगे पाटील यांच्या समर्थनात, तर सदावर्ते यांच्याविरोधात या वेळी जोरदार घोषणाबाजी झाली. सदावर्ते मराठा समाजाच्या आंदोलनाविरोधात ओकत असलेली आग थांबवावी, असे आवाहन या वेळी करण्यात आले. सदावर्ते मराठा समाजाच्या आंदोलनाविरोधात भूमिका घेत राहिल्यास त्यांना रस्त्यावर फिरणे अवघड होईल, असाही इशारा या वेळी देण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT